एकता महिला प्रभाग संघ देवळे” ची वार्षिक सभा उत्साहात संपन्न; नामदार भरत गोगावले यांच्याकडून महिलांना शासकीय मदतीचे आश्वासन

23

एकता महिला प्रभाग संघ देवळे” ची वार्षिक सभा उत्साहात संपन्न; नामदार भरत गोगावले यांच्याकडून महिलांना शासकीय मदतीचे आश्वासन

सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532

पोलादपूर पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील एकता महिला प्रभाग संघ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत आहे — यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्रीगंगा माता देवी हॉल, पोलादपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला तालुक्यातील विविध भागांतील सुमारे ५०० महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, भाजपा अध्यक्ष वैभव चांदे, महिला संघटिका सुवर्णा कदम, पोलादपूर नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, नगरसेविका अश्विनी पवार, गटविकास अधिकारी दीप्ती गाट आणि कृषी अधिकारी वैशाली फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.

गटविकास अधिकारी सौ. दीप्ती गाट यांनी महिलांनी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चातून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत सांगितले की, “या स्वरूपाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या माध्यमातून प्रथमच घेण्यात आला आहे, आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी महिलांचे अभिनंदन करत सांगितले की, “महिला बचत गट हे केवळ बचतीचे नव्हे तर स्वावलंबनाचे ठिकाण झाले आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत महिलांनी आता व्यवसायाच्या क्षेत्रातही आपली छाप पाडावी.”

या सभेच्या निमित्ताने नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते विविध महिला बचत गटांना शासनाच्या योजनेंतर्गत धनादेश वितरित करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत सांगितले की, “या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिलांनी फक्त एकाच व्यवसायावर न थांबता विविध क्षेत्रांत काम करावे — पापड, लोणचं, भाजी लागवड, बांबू शिल्पकला यासारख्या उपक्रमांतून आत्मनिर्भरता साधावी.”

तसेच त्यांनी आश्वासन दिले की, “शासनाच्या सर्व योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रोजगार हमी योजनेअंतर्गत महिलांसाठी आणखी संधी उपलब्ध करून दिल्या जातील.”

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी नामदार गोगावले यांचे मनःपूर्वक आभार मानत, त्यांच्या सहकार्यामुळे स्वावलंबनाचा प्रवास अधिक सशक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.