गोंधळपाडा येथे रक्तदान शिबीर उत्साहात,
३३ रक्तदात्यानी केले रक्तदान
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील जय भवानी मित्र मंडळातर्फे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवातील सामाजिक उपक्रमांतर्गत चार आॅक्टोबर रोजी रायगड जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 33 रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.
गोंधळपाडा येथील जय भवानी मित्र मंडळाच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करण्याचे हे 30 वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळातर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक उपक्रमांतर्गत चार आॅक्टोबर रोजी सकाळी गोंधळपाडा समाजमंदिर येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष मनोज पडियार यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य सुमित चव्हाण, महेंद्र पडियार यांनी शिबिरासाठी विशेष मेहनत घेतली. यावेळी गोंधळपाडा गावासह आजूबाजूच्या परिसरातील तरुणांसह नागरिकांनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 33 रक्तपिशव्या संकलीत करण्यात आल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. दीपक गोसावी, सुशांत भगत, तंत्रज्ञ हेमकांत सोनार, वैभव कांबळे, गणेश भोय, मनिष कुंभार, महेश घाटगे, मंगेश पिंगळा या पथकाने रक्त संकलनास सहकार्य केले. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना डाॅ. दीपक गोसावी, मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.