एसटी कर्मचाऱ्यांचा कुटुंबीयांसह आक्रोश आंदोलन केले.

दिवाळी दोन दिवसांवर आली तरी तीन महिन्यांपासून वेतनच न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी आपापल्या घरांपुढे आक्रोश आंदोलन करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाचा निषेध केला.

पल्लवी मेश्राम प्रतिनिधी

नागपूर:-  दिवाळी दोन दिवसांवर आली तरी तीन महिन्यांपासून वेतनच न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी आपापल्या घरांपुढे आक्रोश आंदोलन करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाचा निषेध केला. अशीच परिस्थिती राहिल्यास आज घरापुढे असलेले कुटुंबीय उद्या रस्त्यावर येऊन आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

लॉकडाउन सुरू झाले तेव्हापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खेळ सुरू आहे. एसटी महामंडळ व कामगार संघटना यांच्यात वेतनासंबंधी जो करार झाला आहे, त्यानुसार प्रत्येक महिन्यात ठरल्या तारखेला वेतन देणे बंधनकारक आहे. तरीही या कराराचे उल्लंघन होत आहे. लॉकडाउनच्या काळातही एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कामावर होते, मात्र, त्याहीवेळी त्यांना नियमित पगार देण्यात आला नाही. या महिन्याचा पुढच्या महिन्यात, तर कधी अर्धा अशाप्रमाणे पगार देण्यात आला. आता तर गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच नाही. वास्तविक दिवाळीत वेतनासहच बोनस देण्याची प्रथा आहे. मात्र, एसटीत बोनस सोडाच, महिन्याचे वेतनही झालेले नाही. वाढीव महागाई भत्ता नाही, उत्सव अग्रीम नाही, दिवाळी भेट नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे बेहाल आहेत. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करावी, हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे हे थकीत वेतन त्वरित द्यावे या मागणीसाठी 9 नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या घरापुढे कुटुंबीयांसह आक्रोश आंदोलन केले.

आता रस्त्यावर उतरू

सकाळी एसटी महामंडळाच्या कार्यालयाजवळ संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले होते. ‘आता कर्मचाऱ्यांची सहनशीलता संपली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा एसटी कामगार संघटनेचे यावेळी देण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here