नुसतं गरीब नाही, गरिबीची जाण असावी लागते

63

नुसतं गरीब नाही, गरिबीची जाण असावी लागते
*————-*————-*————-*

 

राजीवच्या प्रेमात पडली तेव्हा सोनिया अवघी अठरा वर्षांची होती. त्याच वर्षी ती इंग्रजी शिकायला म्हणून इंग्लंडला गेली होती. दिसायला ती एवढी सुंदर होती की रस्त्यातले लोक माना वळवून वळवून तिच्याकडे पाहात असत. ती अगदी ताठ मानेनं चालायची तेव्हा मॅडोनासारख्या तिच्या चेह-यावर गडद तपकिरी केसांची महिरप दिसे. तिचे केस सरळ होते. जोस्तो माफेओ हा हल्लीचा एक सुप्रसिद्ध पत्रकार एके काळी तिचा वर्गमित्र होता. ओर्बासानो शहरात तिचं घर होतं. तिथं टुरीन सेंटरमधून आठवड्याच्या शेवटी ती घरी परतायची तेव्हा बसमध्ये तोही तिच्यासोबत असे. “माझ्या ओळखीतली ती एक सुंदर स्त्री होती.” अशी तिची आठवण त्याला स्मरते. “ती नुसतीच सुंदरच नव्हती तर तिचं आकर्षण वाटावं असं आणखीही काहीतरी तिच्यापाशी होतं. मित्रमैत्रिणींशी ती खूप चांगली वागे. ती शांत आणि समतोल बुद्धीची होती. तिला मोठमोठ्या पार्ट्यांना जायला आवडत नसे, अनोळखी लोकांशी ती ठराविक अंतर ठेवून वागत असे.”

सोनियाचे वडील जाडजूड बांध्याचे होते, त्यांच्या खडबडीत चेह-यावर त्यांच्या खडतर भूतकाळाच्या खुणा स्पष्ट दिसत असत. इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी केंब्रिजला जायचं, ह्या मुलीच्या इच्छेला त्यांनी तीव्र विरोध करावा ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. स्टेफानो मायनोंचे बारीक केस पाठीमागे वळवलेले होते. आपल्या मुलींच्या गालांवर ओठ टेकताना त्यांच्या भरघोस मिशांमुळे मुलींना गुदगुल्या होत. असे हे स्टेफानो वृत्तीने खूप जुनाट होते. ओर्बासानो येथे स्थायिक झाल्यावर त्यांना कळलं की गावातल्या शाळेत मुलगे आणि मुली एकत्रच शिकतात तेव्हा आपल्या मुलींनी तिथे जाऊन शिकावं हे त्यांना पटलं नाही.त्याऐवजी तिथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगानो ह्या शहरातल्या फक्त मुलींच्या शाळेत त्यांना पाठवायचं असं स्टेफानोंनी ठरवलं. त्या जसजशा मोठ्या होऊ लागल्या तसतशा ‘त्या कुठे आहेत?’ ‘कुणाबरोबर आहेत?’ ही माहिती त्यांना हवी असे. त्या शनिवारी-रविवारी मित्रांसोबत जायच्या तेव्हा त्यांना पाठवणं त्यांच्या जीवावरच येत असे. मुलींचं खूप उशीरपर्यंत रात्रीचं बाहेर राहाणं तर त्यांनी खपवून घेतलंच नसतं. मुली जास्तीत जास्त फक्त टुरीनपर्यंत जायच्या. ते शहर त्यांच्या घरापासून बसनं किंवा आगगाडीने अर्ध्या तासावर होतं. तिथं गेलं की शहरातील गर्द वृक्षराजीच्या सुंदर रस्त्यांवरील कमानींखालून त्यांना चालत जायचं असे किंवा मग हवा खराब असेल तर शहरातल्या एखाद्या प्रसिद्ध पॅस्ट्रीच्या दुकानात बसून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हॉट चॉकलेट प्यायचं असे. स्टेफानो अगदी कठोर आणि तत्वप्रिय होते त्यामुळे आपल्या किशोरवयीन लेकींबरोबर त्यांचे वादविवाद होणं अटळच होतं. सगळ्यात मोठी अनुष्का हिचा स्वभाव अधिक तडकफडक आणि बंडखोर होता, तीच बहुदा बापाविरूद्ध बंडाचा झेंडा घेऊन उभी राहात असे. तिच्या तुलनेनं सोनिया म्हणजे अगदी ‘मनमिळाऊ परीच’ होती. सर्वात धाकटी नादिया अशा कटकटी निर्माण करण्याच्या दृष्टीने अजून लहान होती.

स्टेफानोंची पत्नी पॉला हिचे नाकडोळे आखीवरेखीव होते, हसू मनमोकळं होतं. तिच्या वागण्यात कमावलेला डौल होता. स्टेफानोंच्या आडमुठेपणाची भरपाई ती आपल्या स्वभावातील लवचिकपणाने करीत असे. ती अधिक मोकळ्या मनाची, काही गोष्टी चालवून घेणारी आणि समजूतदार होती. कदाचित स्त्री असल्यामुळं आपल्या मुलींना समजून घेणं तिला अधिक सोपं जात असेल. खरं तर तिचं स्वतःचं जीवन अगदी वेगळ्या तऱ्हेनं गेलं होतं. ज्या काळात इटली हा खूप खूप गरीब देश होता त्या काळात-डोंगराळ भागातल्या, सहाशेहूनही कमी लोकवस्तीच्या एका छोट्याशा खेड्यात ती लहानाची मोठी झाली होती. पण तिच्यासारखं तिच्या मुलींना कधी गाईंचं दूध काढावं लागलं नव्हतं, शेतात काम करावं लागलं नव्हतं किंवा कुटुंबानं उघडलेल्या बारमध्ये खाद्यपदार्थ विकायला उभं राहावं लागलं नव्हतं. ह्या मुली महायुद्धानंतर जन्मल्या होत्या. मार्शल प्लॅनच्या, आर्थिक विस्ताराच्या, इटलीच्या पुनरूत्थानाच्या त्या लेकी होत्या. त्यांना गरीबी अगदी अंधुकशी माहीत होती. त्या लहान होत्या तेव्हा- म्हणजे महायुद्ध झाल्यानंतर लगेचच्या काळात लुळेपांगळे आणि भिकारी नजरेस न पडणं अशक्यच होतं. ते लोक गावच्या सार्वजनिक चौकातल्या भिंतींना टेकून लोकांनी आपल्याला दानधर्म करावा म्हणून ऊन खात उभे राहात असत. त्या दृश्याचा खोल ठसा मुलींवर – विशेषतः सोनियावर पडलेला होता. त्याशिवाय त्यांच्या खेड्याजवळ असलेल्या व्हिन्सेंझा शहराच्या मध्यवर्ती भागात पोचेपर्यंत गरीबी दृश्यरूपात अवतरू लागली असे. तेथील झोपडपट्टीच्या भागात मुलं उघडीनागडी खेळताना दिसत किंवा फाटकेतुटके कपडे घालून फिरताना दिसत.
“ पण ह्या मुलांच्या आया त्यांना असं नागडं बाहेरच कसं जाऊ देतात?” छोट्याश्या सोनियानं एकदा गोंधळून विचारलं होतं.
“कारण त्यांच्यापाशी कपडेच नाहीयेत ना. त्यांना तसं राहायचं आहे म्हणून ते राहात नाहीत तर त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नाही म्हणून ते तसे राहातात, कारण ते गरीब आहेत.”

गरीबी ही किती भयंकर गोष्ट असते हे त्या लहानग्या मुलीला प्रथमच कळत होतं. त्यातच भर म्हणून तिला आईने असंही सांगितलं की काही कुटुंबांना उपाशीच राहावं लागतं. चर्चचे फादर नाही का दर महिन्याला पावडरचं दूध, अन्न आणि कपडे गोळा करायला आपल्या घरी येतात आणि गरजू लोकांना वाटायला त्या वस्तू आपल्याकडून घेऊन जातात. फादरना माहिती होतं की मायनो कुटुंबावर आपण भिस्त ठेवू शकतो. मायनो कुटुंब स्वतः कठीण काळातून जात असलं तरी ते एक धार्मिक कॅथलिक कुटुंब होतं आणि म्हणूनच ते दानधर्म करीत होतं.
“ गोस्पेल म्हणतं की स्वर्गाच्या राज्यात गरीबांना सर्वात आधी प्रवेश मिळतो. . तुम्हाला धर्मशास्त्रांत शिकवलं नाहीये का?”
वापरलेल्या कपड्यांचं गाठोडं बांधण्यात आईला मदत करणा-या सोनियानं मान डोलावली. मायनोंच्या घरात काहीही फेकून दिलं जात नसे. काहीही वाया दवडलं जात नसे. मोठ्यांच्या वस्तू धाकट्यांना वारसाहक्कानं मिळत. जे घरात वापरलं जात नसे, ते गरिबांना देण्यात येई. युद्धाची आठवण अजूनही ताजी असल्यामुळं आपल्याजवळच्या अगदी क्षुल्लक वस्तूचीही किंमत ते विसरू शकत नव्हते.

सोनियाचे आईबाप मूळचे व्हेनेटो प्रदेशातले होते. आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एशियागो टेकड्यामधील ल्युसियाना खेड्यातून ते आले होते. तो प्रदेश चराईचा होता. इटलीतील सर्वात लोकप्रिय चीजपैकी एका चीजला त्या प्रदेशाचं नाव देण्यात आलं होतं. स्फटिकांच्या खाणीसाठीही तो प्रदेश प्रसिद्ध होता. तिच्या वडिलांच्या मायनो घराण्यातले लोक रांगडे, प्रामाणिक, स्पष्टवक्ते आणि खूप कष्टाळू होते. सोनियाची आई- पॉला प्रेडिबॉन हिच्या नजरेतून स्टेफानोंचे ते गुण सुटले नव्हते. पॉलाचे पिता ‘कॅराबिनियरी’ हया नावाने ओळखल्या जाणाऱ्या इटलीच्या लष्करी पोलिसदलाचे माजी कर्मचारी होते. निवृत्तीनंतर ते ‘कोमारोलो डी कोंको’ ह्या खेड्यातील ‘द ग्रॅण्डफादर्स बार’ हे हॉटेल चालवू लागले. स्टेफानो आणि पॉला ह्यांचं लग्न ल्युसियाना येथील चर्चमध्ये झालं होतं. अपोस्टल जेम्सला समर्पित केलेल्या त्या चर्चचा त्रिकोणी घुमट थेट स्वर्गाकडे बोट दाखवत होता. ह्या प्रदेशात काही शतकांपूर्वी ओटोमानांची सत्ता होती. त्यांच्याच वास्तुकलेचा तो परिणाम असावा.

९ डिसेंबर, १९४६ ला रात्रीच्या वेळेस कडाक्याच्या थंडीत मारोस्टिका येथील महापालिकेच्या इस्पितळात सोनियाचा जन्म झाला. एशियागो पर्वताच्या पायथ्याशी टेकड्यांच्या परिसरातील ते एक जुनं, छोटं, तटबंदीचं शहर होतं. ‘मुलगी झाली, कन्या झाली,’’ अशी गोड बातमी ल्युसियाना खेड्यात सत्वर पोचली आणि तिचा प्रतिध्वनी घरांच्या आणि तबेल्यांच्या दगडी भिंतींवर, खडकाळ उतारांवर आणि भोवतालच्या डोंगरांवर घुमला आणि दूरवर जाऊन धबधब्यात विरून गेला. नवीन कन्येचं स्वागत करण्यासाठी स्थानिक परंपरेला अनुसरून शेजाऱ्यापाजाऱ्यांनी आपल्या दाराखिडक्यांवर गुलाबी रिबिनी लावल्या. काही दिवसांनी ल्युसियाना पॅरिशमधील फादरनी तिला बाप्तिस्मा दिला आणि तिच्या आईच्या आईच्या (आजीच्या) स्मरणार्थ तिचं नाव ठेवलं एडविग एंटोनिया अलबिना मायनो. परंतु स्टेफानोला आपल्या लेकीसाठी वेगळं नाव हवं होतं. मोठ्या मुलीचं नाव बाप्तिस्म्याच्या वेळी ऍना ठेवण्यात आलं होतं पण तरी तिला ते अनुश्का म्हणत. ह्या दुस-या ऍण्टोनियाला ते सोनिया अशी हाक मारू लागले.

रशियन सीमेवरून जिवंत निसटून परतताना त्यांनी स्वतःला एक वचन दिलं होतं ते वचन ते अशा तऱ्हेने पुरं करीत होते. गरिबीच्या चिखलात लडबडणाऱ्या अनेक इटालियन तरूणांप्रमाणे स्टेफानोही फासिस्ट कल्पनांत आणि मुसोलिनीनं केलेल्या अपप्रचारात भरकटले होतेआणि दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीला स्वतःचं नाव त्यांनी १६ व्या व्हिसेंझा इन्फंट्री डिव्हिजन ह्या तुकडीत नोंदवलं होतं. रशियनांबरोबर झालेल्या पहिल्याच लढाईत तुकडीतील तीन चतुर्थांश लोक कामी आले. हजारो युद्धबंदीही बनले, स्टेफानोही त्यात होते. वाचलेल्या अन्य लोकांसोबत तिथून पलायन करण्यात ते यशस्वी झाले. मग रशियातील स्टेप्स गवताळ प्रदेशातील एका शेतकऱ्याच्या घरात त्यांना आसरा मिळाला. तिथं एका शेतकरी कुटुंबाच्या आश्रयाखाली ते कित्येक आठवडे राहिले. तेथील स्त्रियांनी त्यांच्या जखमांवर मलमपट्टी केली आणि पुरूषांनी त्यांना गरजेच्या इतर काहीबाही वस्तू पुरवल्या. त्या वेळेस ‘आपले जीव वाचले’ ह्या अनुभवाखेरीज इतरही अनुभवांनी त्या लोकांचं संपूर्ण ह्रदयपरिवर्तन झालं. परतलेल्या हजारो इटालियन सैनिकांप्रमाणे स्टेफानोंचाही फासीझमबद्दल भ्रमनिरास झाला आणि आपल्याला वाचवल्याबद्दल रशियनांच्या प्रति त्यांच्या मनात कृतज्ञताबुद्धी निर्माण झाली. तिथून पुढं स्टेफानो राजकारणाविषयी अवाक्षरही काढेनासे झाले. त्यांच्या दृष्टीनं राजकारण हा केवळ खोटारडेपणा होता. ज्या कुटुंबानं त्यांचा जीव वाचवला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला मुलं होतील तेव्हा त्यांना रशियन नावं द्यायची. परंतु आपली सासुरवाडीची माणसं किंवा फादर ह्यांच्याशी वादविवाद न करता स्टेफानोनं मुलींची पूर्णपणे कॅथलिक नावानं नोंदणी करण्यास अनुमती दिली कारण त्या लोकांच्या दृष्टीनं सोनिया हे नाव संतांच्या नामावळीत येत नव्हतं. त्यांना सोफिया हे नाव चाललं असतं पण सोनिया चाललं नसतं…….
(सोनिया गांधी- ललित चरित्र- मूळ लेखक हाविएर मोरो- मराठी अनुवाद- सविता दामले- राजहंस प्रकाशन)
महिला सबलीकरण या ग्रुपमधून साभार.
————————–
भारतीय संस्कृतीत मिसळून गेलेल्या, भारतीय संस्कृतीत ओल्याचिंब झालेल्या, भारतीयांच्या सुखदुःखाची जाण असणाऱ्या, भारतीयांच्या सुखदुःखाशी एकरूप झालेल्या सोनियांजींना वाढदिवसाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा!!!
📷📷📷📷
प्रल्हाद मिस्त्री सर यांचे fb वॉल वरून साभार