अलिबागमध्ये पोर्शे कारची पुनरावृत्ती..! अलिबाग रेवस मार्गावर अपघात
भरधाव अलिशान बीएमडब्ल्यू कार घुसली गॅरेजमध्ये; तिघेजण गंभीर जखमी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: मागील काही दिवसांपासून पुण्यातील अपघाताचे प्रकरण राज्यभर गाजत आहे, पोरशे कार प्रमाणे मुंबई, नवी मुंबई आदी ठिकाणी अलिशान लक्झरी कारच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. असाच काहीसा प्रकार अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस मार्गावर रविवारी (दि.8) रोजी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास चोंढी जवळ डे-फार्म येथील वळणावर अलिशान लक्झरी बीएमडब्ल्यू कार मालक स्वतः अविचाराने व हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत चुकीच्या बाजूला जाऊन बेदरकारपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी गॅरेजच्या शेडमध्ये चालवत जाऊन जोरदार धडक देत गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीसाठी आलेल्या दोन ग्राहकांना व गॅरेज मालकाला गंभीर जखमी केले. यावेळी घडलेल्या भयानक अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळ न दवडता गंभीर जखमी झालेल्या तिघांना इतर वाहन चालकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले व झालेली वाहतूक कोंडी पूर्ववत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, चोंढी येथील संदीप विलास गायकवाड (41) हे आपल्या बीएमडब्ल्यू या कारने रविवारी (दि.8) रोजी संध्याकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास अलिबाग बाजूकडून रेवस बाजूकडे जात असताना हॉटेल साई इन हॉटेलच्या पुढे डे-फार्म जवळील वळणावर आले असता, चुकीच्या बाजूने जात रस्त्याच्या कडेला असलेल्या रवी लक्ष्मण पाटील यांच्या दुचाकी गॅरेजच्या शेडमध्ये जाऊन जोरदार धडक दिली, यामध्ये गॅरेज मालक रवी पाटील(50) रा. धोकवडे- अलिबाग, मंगेश म्हात्रे (52) रा. आगरसुरे-अलिबाग, सोनू नाईक (45) रा. किहीम-अलिबाग असे तिघेजण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारच्या अपघातात गॅरेजमध्ये दुरुस्ती साठी आलेल्या इतर दुचाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातावेळी बीएमडब्ल्यू कार चालकाने मद्यपान केल्याचे दिसून आले आहे, तरी सदर मद्यधुंद बीएमडब्ल्यू कार चालक यांच्यावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी तक्रारीद्वारे पोलिसांकडे केली आहे. या अपघाताबाबत अधिक तपास मांडवा पोलीस निरीक्षक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खोत हे करीत आहेत.