तांत्रिकाकडून आपल्या पतीचा उपचार करुन घेणाऱ्या महिलेवर संबंधित तांत्रिकानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तांत्रिकाने खोलीत नेऊन तेथे कोल्ड ड्रिंकमध्ये काही नशेची औषधं पाजली आणि बलात्कार केला. यानंतर ही गोष्ट कुणाला सांगितली तर पतीला आणखी आजारी करेल आणि मुलांचा बळी चढवेल अशी धमकी दिली.
भोपाळ:- तांत्रिकाकडून आपल्या पतीचा उपचार करुन घेणाऱ्या महिलेवर संबंधित तांत्रिकानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार मध्य प्रदेशमधील इंदोर येथे घडला. पीडित महिलेच्या पतीला अर्धांगवायूचा आजार होता. त्यावरच उपचार करण्यासाठी ही महिला तांत्रिकाकडे आली होती. मात्र, आरोपीने तिला कोल्ड ड्रिंगमधून नशेचं औषध दिलं आणि बलात्कार केला.
विशेष म्हणजे आरोपी तांत्रिक इथंच थांबला नाही. त्याने पीडितेच्या पतीला आणखी आजारी करण्याची आणि मुलांचा बळी देण्याची धमकी देत या महिलेवर पुन्हा घरी येऊन बलात्कार केला. अखेर पीडित महिलेने तांत्रिकाच्या धमक्या आणि शाररीक शोषण याला कंटाळून पोलिसांकडे तक्रार केली.
इंदोरमधील द्वारकापुरी पोलीस स्टेशनने 32 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरुन बाबा कपाली उर्फ निर्मल निवासी पालदा याच्याविरोधात बलात्कार आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं, “माझ्या पतीला अर्धांगवायूचा झटका आलेला होता. त्यामुळे त्यांना हालचालीही करणं शक्य नव्हतं. मला हा तांत्रिक यावर उपचार करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मी पतीला त्याच्याकडे घेऊन गेले. तांत्रिकाने सुरुवातीला काही इलाज केला आणि त्याचा पतीला फायदा झाल्याचं दिसलं. त्यामुळे या तांत्रिकावर विश्वास बसला.”
“मात्र, नंतर या तांत्रिकाने मला एका खोलीत नेऊन तेथे कोल्ड ड्रिंकमध्ये काही नशेची औषधं पाजली आणि बलात्कार केला. यानंतर ही गोष्ट कुणाला सांगितली तर पतीला आणखी आजारी करेल आणि मुलांचा बळी चढवेल अशी धमकी दिली. तांत्रिकांच्या धमक्यांना घाबरून सुरुवातीला मी याबद्दल कुणालाही सांगितलं नाही. याचा गैरफायदा घेत तांत्रिकाने बरेच दिवस घरी येऊन शारीरिक शोषण केलं,” असंही या पीडितेने नमूद केलंय.
अखेर पीडित महिलेने या शोषणाला कंटाळून आपल्या नातेवाईकांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर या तांत्रिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं आश्वासन दिलंय. इंदोर पश्चिमचे पोलीस अधिकारी (एएसपी) प्रशांत चौबे म्हणाले, “ही घटना 2 महिन्यांपूर्वीची आहे. महिलेने तक्रार केल्यानंतर याचा तपास सुरु आहे. आरोपी आधीच दुसऱ्या एका प्रकरणात तुरुंगात आहे. त्याला या प्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल.”