सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार देणे महिलेला पडले भारी, खोटी तक्रार दिल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल.

53

सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार देणे महिलेला पडले भारी, खोटी तक्रार दिल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल.

सातारा:- साताऱ्यातील वाईमध्ये खोटी सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल करणे महिलेच्या चांगलेच अंगलट आले आह. या महिलेविरोधात न्यायालयाने खटला दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहे. जिल्ह्यात असे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रकारात वाढ होत असून यामुळे खळबळ उडाली आहे.

घडलेली हकीकत अशी की, 27 जुलै 2019 रोजी वाई पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने दोघांवर नोकरीला लावतो असे आमिष दाखवत वाई ते महाबळेश्वरच्या दरम्यान वारंवार गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, वाई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या तपासामध्ये पोलिसांना असे निष्पन्न झाले की, या दोघांपैकी एक आरोपी गुन्हा घडल्याच्या दिवशी परदेशात होता तर दुसरा आरोपी पुण्यात असल्याचे समोर आले.

ज्या चारचाकी गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा घडला असे सांगण्यात आले होते. ती कार गुन्हा घडण्याच्या आगोदर नांदेडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आले.

महिलेने दिलेली तक्रार आणि तपासात समोर आलेल्या सर्व बाबीमध्ये तफावत असल्याने पोलिसांनी या प्रकरणात ‘ब’ नावाने समरी वाई कोर्टात दाखल केली. त्यानुसार, महिलेने दिलेली तक्रार चुकीची आणि द्वेषापोटी केली असल्याचे कोर्टात सिद्ध झाल्याने वाई कोर्टाने बलात्काराची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरुद्ध खटला दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

न्यायालयाने पोलिसांना आदेश दिल्यामुळे वाईमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खोटी तक्रार देऊन दोन जणांना बलात्काराच्या गुन्हा अडकवण्याचा प्रयत्न महिलेच्याच अंगलट आला आहे. पोलीस या महिलेविरोधीत खोटी तक्रार दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहे.