मुंबईमधील रुग्णालये अग्निसुरक्षेविना.

52

मुंबईमधील रुग्णालये अग्निसुरक्षेविना.


मुंबई:- भंडारा येथील दुर्घटनेनंतर आता मुंबईतील रुग्णालयांतील अग्निसुरक्षेवर बोट ठेवले जात आहे. मुंबईत राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. येथील हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच रुग्णालये सोडली तर बहुतांश रुग्णालयांत फायर ऑडिटपासून अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत, अशी टीका या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकार आणि महापालिका प्रशासन यांनी अशा रुग्णालयावर कारवाई करण्याची गरज असताना त्यांच्याकडे साफ कानाडोळा केला जातो, अशी टीका सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे अग्निशमन दलाने सोयीस्कररीत्या यावर बोलणे टाळत चुप्पी साधली आहे. त्यामुळे भंडारा येथे ज्याप्रमाणे घटना घडली तशी घटना मुंबईतही घडू शकते म्हणून सरकार, महापालिका आणि रुग्णालय प्रशासन यांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे म्हणणेदेखील मांडण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत सांगितले की, मॉल, कार्यालय, रुग्णालये अशा सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. येथे दोन वर्षांनी फायर ऑडिट होणे गरजेचे आहे. मात्र ते होत नाही. मुंबईतील अनेक खासगी, सार्वजनिक रुग्णालये आणि नर्सिंग होममध्ये फायर ऑडिट होत नाही. जेव्हा कमला मिल दुर्घटनेनंतर शाळा, रुग्णालये, नर्सिंग होम, थिएटर अशा ठिकाणी लोक येत असतात. येथे फुलप्रूफ ऑडिट झाले पाहिजे. तशी मी मागणी सभागृहात केली होती. पण यंत्रणा आग लागल्यानंतर, नागरिकांचा जीव गेल्यानंतर ऑडिट करतात. तसेच ज्या रुग्णालयांनी ऑडिट केले नाही अशांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.