श्रीराम शाकाहारी कि मांसाहारी यावर भांडत असताना, हाडामांसाच्या १०० कोटी भारतीयांच्या पोटाला ना धड शाकाहार मिळत आहे ना मांसाहार. त्यांचं काय ?

124

भारतात आजघडीला किती लोक उपाशीपोटी झोपत आहेत? वाचून धक्का बसेल

मनोज कांबळे: श्रीराम शाकाहारी कि मांसाहारी यावर सध्या आपण भांडत आहोत. पण सध्या देशात हाडामांसाच्या १०० कोटी पेक्षा जास्त भारतीयांच्या पोटाला ना धड शाकाहार मिळत आहे ना मांसाहार. त्यांचं काय? भारतात आजघडीला किती लोक उपाशीपोटी झोपत आहेत? वाचून धक्का बसेल. 

जगातील भूकमारीची मोजमाप करणाऱ्या ग्लोबल हंगर इंडेक्स २०२३ नुसार भारताचा १२५ देशांपैकी १११ क्रमांक होता. भारतात भूकमारीचा दर २८.७ आहे, जो गंभीर परिस्थितीत मानला जातो. पाकिस्तान(१०२) बांगलादेश (८१) श्रीलंका(६०) मध्ये भारतापेक्षा कमी भूकमारी आहे. 

का झोपतोय भारत उपाशी?

UNच्या रिपोर्टनुसार भारतातील ७४ टक्के (१०० कोटी पेक्षा जास्त) लोकांना योग्य आहार मिळत नाही. देशातील १६.६% भारतीय लोक कुपोषित आहेत. तर कुपोषित मुलांच्या प्रमाणात तर भारत १८.७% सह दुर्दैवाने जगात सर्वप्रथम येतो. स्त्रियांच्या बाबतीतील एक खुलासा तर अजून धक्कादायक आहे.

भारतातील १५-२४ वर्षे गटातील ५८% महिला ‘अनेमिया’ आजारग्रस्त आहेत. याचाच परिणाम म्हणजे ५ वर्षाखालील मुलांच्या होणाऱ्या मृत्यूंपैकी ६९% मृत्यू हे फक्त कुपोषणामुळे झाले आहेत. हे फक्त आकडे नाहीत, यामागे तो प्रत्येक भारतीय नागरिक आहे, जो अर्धपोटी, उपाशी राहत आहे.

पण हे कसं शक्य आहे? देशात सध्या नवनवीन कॅफे, हॉटेल्स सुरु होत आहेत. फूड रील्स लाखोंच्या संख्येने व्हायरल होत आहे. झोमॅटो, स्विगीवर लाखोने ऑर्डर होतात. मग हि उपासमारी कुठे आहे? हि फेक न्यूज आहे. सध्याच्या भारत सरकारने असच काहीसं मत मांडलं होत. सरकारच्या म्हणण्यानुसार, 

Global Hunger Index 2023 चा भारतातील भूकमारीचा रिपोर्ट चुकीचा आणि देशाला बदनाम करणारा आहे. जगभराने मान्य केलेला रिपोर्ट एकवेळ चुकीचा असेल, पण सरकारनेच प्रकशित केलेला National Family Health Survey 19-21 चा रिपोर्टही तितकाच चिंतीत करणारा आहे. काय वेगळं आहे या रिपोर्टमध्ये?

– बाल-मृत्यूदर दर हजार जन्मांमागे ३५.२ आहे.
– ५ वर्षाखालील मुलांच्या मृत्युदर हजारामागे ४१.९ आहे.
– याच वयोगटातील कुपोषित मुलांचे प्रमाण १९.३ तर अतिकुपोषित ७.७ आहे.
– ५७% महिला, २५% पुरुष अनेमिया आजारग्रस्त आहेत.

परिस्थिती गंभीरच आहे. मग आपण काय करतोय?

लोकांचा खासगी आस्थेचा विषय असणारा देव शाकाहारी कि मांसाहारी यांवरून राजकारणी, न्यूज चॅनेल्स, तावातावाने भांडत आहे. शाकाहारी माणूस चांगला कि मांसाहारी? यावरून ट्रेंड्स चालतायत. मग ज्यांना शाकाहार – मांसाहार दोघांपैकी धड काहीच मिळत नाही, त्यांच्यासाठी कोण डिबेट करणार?

प्रोटिन्स निरोगी आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो. दुर्दैवाने ८०% पेक्षा जास्त भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता आहे, असे इंडियन मार्केट रिसर्च ब्युरो सांगते. कारण भारतीय आहार हा तृणधान्यांवर केंद्रित असतो, जो शरीराला प्रोटिन्सचा पुरेसा पुरवठा करत नाही.

दूध,अंडी,मांस,सोया हे शरीराला योग्य प्रमाणात प्रोटिन्सचा पुरवठा करतात. पण हे अन्नपदार्थ दारिद्र्य रेषेखालील लोक, शालेय मुले यांना सहज मिळतात का? ‘मिड डे मेल’ अंतर्गत शाळेतील मुलांना अंडी, नॉन व्हेज पदार्थ देण्यावर देशातील विविध धार्मिक संघटनांनी नेहमीच विरोध केला आहे.

इतकेच काय मुंबईमधील IIT सारख्या उच्चवैज्ञानिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा शाकाहारी वि. मांसाहारी आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद उफाळून आणला गेला होता. जिथे मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडाची कारवाई करण्यात आली होती.

Image

प्रश्न शाकाहारी चांगले कि मांसाहारी चांगले? हा नाहीच आहे. 

प्रश्न हा आहे कि,ज्या भारतीयांना तीन वेळेचे पोटभर अन्न मिळत नाही, त्यांना अन्न देण्यासाठी सरकार काय करत आहे?रेशनवरून उत्तम प्रतीचे धान्य वेळेवर पुरवले जात आहे कि नाही? धार्मिक प्रथा आणि संघटनांच्या दबावामुळे सरकार जनतेच्या आहारावर, पर्यायी आरोग्यावर घातक परिणाम करते आहे का?

न्यूज चॅनेल्सवर डिबेट्स या प्रश्नांवर होणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर हे प्रश्न ट्रेंड होणे गरजेचे आहे. राजकारण्यांनी भुकेल्या पोटांचा आवाज उठवणे गरजेचे आहे. 

नाहीतर, महाराष्ट्राच्या महान संत परंपरेतील संत तर सांगून गेले आहेतच, खरी श्रद्धा असेल देवाला सर्व लेकरं सारखीच.