क्रीडा पानांचा जनक हरपला

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

मराठी दैनिकात सर्वप्रथम क्रीडा पान सुरू करून देशी विदेशी खेळाला मानाचे पान मिळवून देणारे जेष्ठ क्रीडा पत्रकार, स्तंभलेखक, समालोचक, समीक्षक वि वि करमरकर यांचे दुःखद निधन क्रीडा रसिकांच्या मनाला चटका लावून जाणारे ठरले आहे.

आज सर्वच वर्तमानपत्राचे शेवटचे पान हे क्रीडा विषयाला वाहिलेले असते. माझ्या सारखे असंख्य वाचक वर्तमानपत्र वाचनाची सुरवातच शेवटच्या पानाने करतात पण एककाळ असा होता की वर्तमानपत्रात क्रीडा विषयाला नगण्य स्थान होते. पूर्ण पान तर सोडाच पण चार ओळींची क्रीडा विषयक बातमी छापून आली तरी पुरेशी अशा काळात करमरकरांनीनी क्रीडा पत्रकारीता सुरू केली.

करमरकरांचे पूर्ण नाव विष्णू विश्वनाथ करमरकर. मित्र परिवारात ते विकिक नावानेच परिचित. ते मूळचे नाशिकचे. नाशिकमध्येच त्यांचे शिक्षण झाले. उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठात पूर्ण करून ते पत्रकारितेकडे वळले. करमरकरांच्या पत्रकारितेची सुरवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि एस एम जोशी यांच्या सहकारी तत्वातर चालणाऱ्या लोकमित्र मधून केली. १९६२ साली महाराष्ट्र टाईम्स सुरु झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर यांचा सहभाग होता. द्वा. भ कर्णिक संपादक असलेल्या या दैनिकात सुरवातीला दोन कॉलममध्ये क्रीडा बातम्या येत असत. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले. संपूर्ण मराठी दैनिकांच्या जगतात हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. खेळाच्या बातम्या, समीक्षण व स्तंभ लेखन याविषयी मराठी माणसाची अतृप्त तहान – भूक भागवण्यास करमरकरांची क्रीडा पत्रकारिता पूरक ठरली आणि सर्व मराठी वृत्तपत्रात क्रीडा पत्रकारांना मानाचे पान व हक्काचे स्थान उपलब्ध झाले. वाचकांचा वाढता प्रतिसाद पाहून अन्य दैनिकांनीही त्याची री ओढली आणि हळूहळू सर्वच वर्तमानपत्रांनी शेवटचे पण क्रीडा विषयासाठी राखीव ठेवले.

वि वि करमरकर यांचा वाचकवर्ग त्यांच्या क्रीडा विषयक लेखांनी झपाटून गेला होता. वाचक वर्तमानपत्राचे पहिले पान वाचल्यानंतर थेट शेवटचे पान उघडायचे आणि करमरकरांचे लेख वाचायचे. क्रिकेट कसोटी मालिका, क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा यांचे त्यांनी केलेले वार्तांकन आणि त्यावरील त्यांनी लिहिलेले लेख आजही वाचकांच्या स्मरणात आहे. १९८२ साली दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बांधकामादरम्यान झालेल्या अपघातात काही मजूर मृत्यूमुखी पडले होते त्यावर त्यांनी रक्तरंजित नावाचा लेख लिहिला होता त्या लेखाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागली होती.

करमरकरांनी केवळ खेळविषयीच नाही तर खेळाडू, प्रशिक्षक, पंच, ग्राऊंडसमन, समालोचक, संघटक यांच्यासाठीही काम केले. त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. करमकरकर हे केवळ पत्रकार, स्तंभलेखकच नव्हते तर एक चांगले समालोचकही होते. आकाशवाणी, दूरदर्शन तसेच विविध टीव्ही चॅनलवर त्यांनी केलेली सामन्यांचे धावती समालोचने गाजली. केवळ क्रिकेटचीच नव्हे तर खो – खो, कबड्डी, कुस्ती, टेबलटेनिस या खेळाचे समलोचनही त्यांनी केले. आपल्या धावत्या समालोचनात सोप्या आणि आपण निर्मित केलेल्या शब्दांची पेरणी ते अचूक करत त्यामुळे श्रोत्यांना खेळाची अधिक तपशीलवार माहिती मिळत.

वि वि करमरकरांच्या निधनाने क्रीडा विश्वातील असा एक महान पत्रकार हरपला की ज्याने क्रीडा क्षेत्राला मानाचे पान मिळवून दिले. वि वि करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here