सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला..

सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला..

रायगड ब्युरो चीफ
रत्नाकर पाटील

अलिबाग :- सण आणि संगीत…याच एक वेगळं नातं आहे. महाराष्ट्राच्या संगीतात लोकसंगीताच आपल एक विशिष्ट स्थान राहील आहे. या लोकसंगीतात कोळीगीत… या गीत प्रकाराने तर सार्‍या महाराष्ट्राला ठेका धरायला लावले. मग ते गीत लग्न सोहळ्यातील असो, देव देवतांवर आधारित असो अथवा होळीच्या सणावर आधारित असो. प्रत्येक गीताने आपला असा ठसा श्रोत्यांच्या मनावर उमटवला आहे.
सध्या सर्वत्र होळीचे वातावरण तयार झाले आहे. कोकणात तर होळीच्या सणाची चाहूल लागली की, अंगात उत्साह संचारतो. एरव्ही कधी गावी न येणारा मुंबईचा चाकरमनी गणेशोत्सव आणि होळी या दोन सणांना हमखास गावी दिसणार. काही ठिकाणी 10 तर काही ठिकाणी 15 दिवस हा होळीचा सण साजरा होतो. मुख्य दिवशी साजरी होणारी होळी, त्या दिवशी रचला जाणारा होम आणि इतर कार्यक्रम यांची मजा काही औरच.
लावणी, भारुड, गोंधळादरम्यान गायली जाणारी गाणी, भोंडल्याची गाणी, वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, भलरी गीते, आदिवासी गीते, पोवाडे, मोटेवरची गाणी ही लोकगीत प्रकारात समाविष्ट होतात. कोळीगीत ही प्रामुख्याने 1960 नंतर खर्‍या अर्थाने मोठ्या प्रमाणात ध्वनीमुद्रित होऊ लागली. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, कृष्णा शिंदे, परशुराम तैवाडे, विठ्ठल शिंदे, पांडुरंग आगवणे, पांडुरंग वनमाळी, रमेश नाखवा, बालकराम वरलीकर, दामोदर विटावकर, रंजना शिंदे, शाहीर साबळे, संगीतकार मधुकर पाठक आणि अन्य काही समकालीन गायक, संगीतकारांनी जी काही गाणी दिली, त्या गीतांचा गोडवा आजही कायम आहे. टिमकी बाजा सारखी मोजकीच वाद्य साथीला घेऊन रेकॉर्ड केलेली ती गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. त्यानंतर 1980-90 च्या दशकापासून आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, वेसावकर मंडळी, त्यानंतर नंदेश उमप, संदेश उमप, आदर्श शिंदे यांच्यासह इतर असंख्य लोकगीत गायकांनी लोकगीतं गाजवली आहेत.
प्रत्येक सणावर गाणी तयार झाली. मंगळागौर, गणपती उत्सव, नागपंचमी, दसरा, दिवाळी, लग्न गीते आणि होळीची गाणी देखील गाजली. कृष्णा शिंदे, विठ्ठल शिंदे यांची लग्न गीते अधिक गाजली. तर विठ्ठल उमप हे कोळीगीतांचे बादशहा ठरले. त्यांच्या जोडीला पांडुरंग वनमाळी, बालकराम वरलीकर, रमेश नाखवा, पांडुरंग आगवणे यांची कोळीगीते देखील रसिकांनी डोक्यावर घेतली. सत्यनारायणाच्या पूजेला ‘‘ऐका सत्यनारायणाची कथा’’ हे गाणे वाजले नाही तर नवलच.
आमचे दाराशी हाय शिमगा
प्रत्येक सणाचे गाणे, प्रत्येक गाण्याचा आपला असा आवाज. सध्या होळीचा सण तोंडावर आला आहे. मुख्य होळी जरी 13 मार्च रोजी साजरी होणार असली तरीही त्याची वातावरण निर्मिती सुरू झाली आहेे. कोकणात होळीची पारंपारिक गाणी गाणार्‍या महिलांची जुनी पिढी सरली असली तरी त्या पिढीचा वारसा नव्या पिढीतील काही हौशी महिलांनी राखला आहे. पारंपारिक गीतात काही कोळीगीत आपली जागा आजही राखून आहेत. त्या गीतांपैकी रमेश नाखवा यांनी लिहिलेले आणि गायलेले तसेच मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेले ‘आमचे दाराशी हाय शिमगा.. सन शिमग्याचा आयला रे आमच्या गावा……’ हे गीत आजही तितकंच तरुण आहे. जितकं नव्याने वाजणार कोणतही गीत. याच तरुण गीतामध्ये जुन्या पिढीतील गायक पांडुरंग आगवणे यांनी गायलेले ‘लाने गो झांजुराचे.. हवलाय झांजुराचे…’ हे गीत. रमेश नाखवा यांच्या आवाजातील ‘सन शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला..’ त्याबरोबरच बालकराम वरलीकर यांच्या आवाजातील ‘चांदण्यान चांदण.. पीठभर चांदणं’ हे गीत. ही अवीट गोडीची होळीच्या सणावर आधारित गाणी आजही गावच्या होळीला वाजवली जातात. तरुणाईला हिंदी गीतांची नशा चढली असली तरी सणांमध्ये जुन्या पारंपरिक गीताचा उतारा लागतोच!
शिमगा..होळी…होलिका.. जस गाव, तसा उच्चार!, पण सण एकच. होळीचा….! होळीच्या सणाचे महत्व कोकणवासीयांना अधिक. कारण खर्‍या अर्थाने या सणाची परंपरा कोकणवासीयांनी आजही जपून ठेवली आहे. इतर ठिकाणी अगदी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातही इतका उत्साह पहायला मिळत नाही, जितका कोकणात दिसून येतो.