दाताळा येथे होणार अत्याधुनिक क्रीडा संकुल

दाताळा येथे होणार अत्याधुनिक क्रीडा संकुल
🔺आ. सुधीर मुनगंटीवार यांची क्रीडा मंत्र्यांकडे पत्राद्वारे विनंती

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 10 मार्च
चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा दाताळा येथे उभारण्यात येणार्‍या वीर बाबुराव शेडमाके स्टेडियमच्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्राद्वारे तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे.
चंद्रपूर जिल्हा हा वनसंपत्तीने समृद्ध आणि आदिवासीबहुल भाग आहे. येथे मोठ्या प्रमाणात खाण उद्योग आहेत. जिल्ह्यातील युवक-युवती क्रीडा क्षेत्रात अग्रेसर रहावेत, यासाठी उत्तम क्रीडा सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्यातील खेळाडू चमकावे, याकरिता अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय मुनगंटीवार यांनी घेतला आहे.
राज्य क्रीडा समितीची अंतिम मान्यता मिळण्यासाठी आणि पुढील प्रक्रिया गतीने व्हावी, यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांची तातडीने बैठक आयोजित करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांनी दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे. या बैठकीनंतर प्रस्तावास अंतिम मान्यता मिळाल्यास जिल्ह्यातील युवकांना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
=====
प्रकल्पासाठी 137 कोटींचे अंदाजपत्रक तयार
20 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मौजा दाताळा येथे क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय झाला. नवीन चंद्रपूर विकास योजनेतील सहाय्यक संचालक, नगररचना व विशेष नियोजन प्राधिकरण यांनी मौजा दाताळा येथील नवीन चंद्रपूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 152 स्टेडियम कॉम्प्लेक्ससाठी 16 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर क्रीडा संकुल उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 यांच्यामार्फत 137 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हे प्रस्तावित अंदाजपत्रक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले आहे.