अजित पवारांनी सादर केला अर्थसंकल्प
♦️अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 10 मार्च
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया संमिश्र असून, त्यांनी या अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले आहे.
===
राज्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प : डॉ. अशोक उईके
‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची हमी देणारा तसेच देश व राज्याच्या विकासचक्राला अधिक गती देणारा हा अर्थसंकल्प आहे. यात उद्योग, पायाभुत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्रे, सामाजिक क्षेत्र आदींचे जाळे अधिक विस्तृत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प महायुतीच्या सरकारने मांडला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत आदिवासी विकास विभागाच्या निधीमध्ये तब्बल 40 टक्क्यांनी वाढ करून, यावर्षी 21495 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या धोरणात्मक निर्णयामुळे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीला चालना मिळणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले.
===
अर्थसंकल्प खर्या अर्थाने जनताभिमुख : आ. सुधीर मुनगंटीवार
अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने सादर केलेला अर्थसंकल्प खर्या अर्थाने जनताभिमुख असून, महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारा आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, दळणवळण आणि पर्यावरण या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांना दिलेले प्राधान्य स्वागतार्ह आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक आहे. या सकारात्मक आणि दूरदृष्टी असलेल्या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो व अर्थमंत्र्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
===
विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य साधणारा अर्थसंकल्प : हंसराज अहिर
महाराष्ट्राला विकसित राज्य करुन सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला असून, सन 2025-26 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पातून समतोल साधत शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, दिव्यांग, महिला उत्थान बरोबरच अनुसाचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक, आदिवासी, ओबीसी घटकांच्या कल्याणाकरिता भरीव आर्थीक तरतुद अर्थसंकल्पात केल्याने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक विकासात आमुलाग्र परिवर्तन होईल, अशी प्रतिक्रीया राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली आहे.
===
रोजगाराभिमुख अर्थसंकल्प : डॉ. अशोक जीवतोडे
हा भावी काळात 71 लाख 7 हजार 500 रोजगार देण्याचा संकल्प असलेला अर्थसंकल्प असल्याने तो रोजगाराभिमुख आहे. या अर्थसंकल्पात भौतिक संसाधनांसोबत नागरिकांच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करण्यात आला आहे. एकूणच राज्याला पुढील पाच वर्षात नविन दिशा देणारा व विकसित महाराष्ट्राकडे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे.
===
राज्याला फसवणारा अर्थसंकल्प : खा. प्रतिभा धानोरकर
सन 2025-26 चा अर्थसंकल्प हा राज्यातील सर्वच घटकांना फसविणारा आहे. शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा नाही. लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नाही. केवळ घोषणा करुन सर्वच घटकांची दिशाभूल केली आहे. मोटर वाहनांवरील कर वाढवून सामान्यांची देखील हे सरकार दिशाभूल करीत आहे. शेतकरी शेतमजूर तसेच उद्योगांसाठी हा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.
===
शिक्षक ते शेतकरी निराशच : आ. सुधाकर अडबाले
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी 2025-26 मध्ये सरकारने एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जास्तीत जास्त बजेट हा बांधकामावर करण्यात आला आहे. शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी यांची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका आ. सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
===
सर्वसमावेशक आणि विकासोन्मुख अर्थसंकल्प : आ. किशोर जोरगेवार
हाअर्थसंकल्प समाजातील प्रत्येक वर्गाला स्पर्श करणारा असून, विकासोन्मुख आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार, तरुण, महिला आणि उद्योग क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा, कृषी विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून, यामुळे महाराष्ट्र निश्चितच प्रगतिपथावर वाटचाल करेल, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.
===