फुले दांपत्याला भारतरत्न द्यावे ही मागणी सर्वप्रथम राष्ट्रीय ओबीसी महासंघाची : डॉ. अशोक जीवतोडे
अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांनी मांडलेल्या ठरावाचे समस्त ओबीसी समाजातर्फे अभिनंदन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 11 मार्च
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ०७ ऑगस्ट २०१८ ला वरळी मुंबई येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशनामध्ये फुले दांपत्याला भारतरत्न द्यावे ही मागणी होती. त्यावेळेस सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीसह उद्घाटक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तसेच स्वागताध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, अध्यक्षस्थानी डॉ. अशोक जीवतोडे व महासचिव सचिन राजुरकर उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापण्यापासून ही मागणी करीत आला आहे. तसेच २०१८ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्राच्या अधिवेशनात लोकसभेमध्ये ही मागणी लावून धरली होती.
यानुसार राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्थापनेपासून झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक ओबीसी अधिवेशनात फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसह फुले दाम्पत्यांचे समग्र वाड्मय दहा रुपयात उपलब्ध करून द्यावे, ही मागणी देखील ठेवली होती. याबाबत राज्य व केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा देखील करण्यात आला होता. त्या सर्व जाणीव जागृतीची दखल घेऊन महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षीय आमदारांनी मिळून या मागणीला पाठिंबा दिला ही समस्त ओबीसी समाजाकरीता आनंदाची बाब आहे. मागणी केलेल्या सर्वपक्षीय आमदारांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आम्ही स्वागत तथा अभिनंदन करतो, तथा लवकरात लवकर सर्व पक्षीय आमदारांनी एकमताने केंद्राकडे या मागणीची शिफारस करुन तात्काळ फुले दाम्पत्यांना भारतरत्न द्यावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केली आहे.