सरदार पटेल महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 11 मार्च
स्थानिक सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, मराठी विभागाद्वारे कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर जयंती, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी स्वरचित काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, प्रमुख अतिथी कवी प्रदीप देशमुख, डॉ. पद्मरेखा धनकर मराठी विभागप्रमुख, प्रा. सोहन कोल्हे हे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मातृभाषेचे महत्त्व प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्मरेखा धनकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत भाषा ही जीवन जगण्याचे माध्यम आहे. उक्तीपेक्षा कृतीशीलतेने भाषा व्यक्त झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली येथे कवी संमेलनात चंद्रपूरचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल डॉ. पद्मरेखा धनकर यांचा महाविद्यालय व मराठी विभागातर्फे सत्कार करण्यात आला.
कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर जयंती, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागातर्फे
विद्यार्थ्यांसाठी स्वरचित काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी प्रेम कविता, सामजिक कविता, राजकिय कविता सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यात प्रथम क्रमांक अश्विनी मोरे बी. ए. प्रथम वर्ष व द्वितीय क्रमांक श्रुती निकुरे बी. ए. तृतीय वर्ष या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अश्विनी मोरे यांनी ‘प्रेम म्हणजे काय?’ व श्रुती निकुरे यांनी ‘मुलीची आत्मकथा’ ही कविता सादर केली. स्वरचित काव्यस्पर्धेचे मूल्यांकन कवी प्रदीप देशमुख यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात कविता सादर करताना कविता कशी असावी, कवितेचे निकष, कवितेत व्याकरणीय नियम जपले पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यांनी प्रेम कविता आणि सामजिक कविता सादर केल्या व रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे संचालन मराठी विभागचे प्रा. धनराज मुरकुटे तर आभार प्रा. सोहन कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागाचे प्रा. अनंता मल्लेलवार, प्रा. श्वेता चंदनकर, प्रा. विवेक पवार, प्रा. वैशाली पंडीत, राजुभाऊ इंगोले, अमर वेरूळकर यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
