गोल्ड कोस्ट: राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी एका भारतीय नेमबाजानं पदकांचा ‘डबल धमाका’ केला आहे. हिना सिद्धूच्या पाठोपाठ आता पुरुषांच्या नेमबाजीत ओम मिथरवाल यानं दुसरं पदक मिळवलं आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या ओमने ५० मीटर प्रकारातही कांस्य पदक जिंकलं आहे.

ओमने २०१.१ गुणांसह तिसरं स्थान निश्चित करून भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेल्या जीतू रायनं मात्र ५० मीटर प्रकारात निराशा केली. जीतूला १०५ गुणांसह शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

ओमनं अंतिम फेरीत सुरुवात दमदार केली होती. पहिल्या सत्रात अचूक वेध घेत तो पहिल्या स्थानावर होता. दुसऱ्या सत्रात सिंगापूरच्या स्वे होन लिमने सरस कामगिरी करत पहिलं स्थान गाठलं तर ओम दुसऱ्या स्थानावर पोहोचला. राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मी. एअर पिस्तूल प्रकारात दोनवेळा सुवर्णपदक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल रेपाचोलीने दमदार कामगिरी करत ओमला तिसऱ्या स्थानावर ढकलले. मात्र, त्यानंतर सावरलेल्या ओमने सावधगिरीने खेळ करत तिसरे स्थान कायम राखले व कांस्य पदक निश्चित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here