अलीकडच्या काळामध्ये घर बांधणीसाठी जांभ्या दगडाला मोठ्या प्रमाणात पसंती.
✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
माणगाव : अलीकडच्या काळामध्ये घरबांधणी करण्यासाठी जांभा दगडाला पसंती मिळत आहे. घरबांधणी व अन्य बांधकामासाठी जांभा दगडाचे म्हणजे चिऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. सुंदर, आकर्षक अशा घराचे बांधकाम जांभा दगडातून मोठ्या प्रमाणात होत आहेत.
कोकणात मोठ्या प्रमाणावर जांभा दगड आढळून येतो. येथील अनेक घरे याच दगडांची असतात. अलीकडच्या कालावधीमध्ये दक्षिण रायगडमधील माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यांत जांभ्या दगडाच्या म्हणजेच चिऱ्याच्या खाणी निर्माण केल्या आहेत. या खाणीतून निर्माण झालेला जांभा दगड मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. सुंदर रंग आणि आकर्षक असलेले या जांभा दगडाचे बांधकाम जलद गतीने आणि टिकाऊ असते. साधारणतः १५० वर्षे हे बांधकाम टिकून राहू शकते. उबदार, थंडावा देणारे जांभा दगड त्याच्या आकर्षक रंगामुळे प्रसिद्ध आहेत. या दगडाच्या बांधकामासाठी सिमेंट, वाळू इत्यादी वस्तू कमी प्रमाणात लागतात. बांधकाम झाल्यानंतर पुन्हा रंग द्यावा लागत नाही. वारंवार येणारा रंगकामाचा खर्च वाचतो. तापमानानुसार घरातील वातावरण नियंत्रित होत असल्याने अलीकडे या दगडातून बांधकाम करण्यास पसंती मिळत आहे.
दगडाचे वैशिष्ट्ये म्हणजे
जांभा दगड उष्ण व विषुवृत्तीय प्रदेशात आढळतो. कोकणात हा खडक मोठ्या प्रमाणात आढळून येतो. लालसर रंगामुळे हा खडक उठून दिसतो. यामध्ये लोह व बॉक्साईट खनिज मोठ्या प्रमाणात असतात. अतिशय खडबडीत आणि वजनाने हलका, सचित्र असा हा खडक असतो. खाणीतील खडकापासून त्याचे तुकडे करून त्याचा चिरा तयार केला जातो. हे चिरे बांधकामासाठी वापरतात. १४ इंच लांब, ९ इंच रुंद, ७ इंच उंच, अशा आकारात साधारणत: एक चिरा वापरला जातो. साधारणपणे शेकडा तीन हजार रुपयांपासून याची किंमत घेतली जाते. अंतरानुसार घरपोच करण्याचे कमी जास्त प्रमाणात भाडे आकारले जाते.
दिसायला आकर्षक असलेले जांभा दगडाचे बांधकाम अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होत आहे. अवकाळी पावसामुळे विटांचे भाव वाढलेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये बाजारात विटांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. जांभा दगड मात्र सहज उपलब्ध होत असल्याने आणि बांधकामासाठी सोयीचा असल्याने त्याचे बांधकाम वाढले आहे.
जांभा दगडातील बांधकाम सुंदर व आकर्षक दिसते. घरासाठी वेगळ्या पद्धतीचा देखावा, टिकाऊपणा, तापमान नियंत्रित करण्याची क्षमता यामुळे त्याला अधिक पसंती आहे. दक्षिण रायगडातील खाणीमध्ये जांभा दगड तयार होत असल्याने त्याचा अधिक प्रमाणात वापर केला जातो.
गुणवत्तेवर या दगडाला मागणी आहे. अंतरानुसार वाहतुकीचा खर्च असल्याने याची किंमत वाढते. प्रत्यक्ष जागेवर हा दगड शेकडा ३ हजार रुपये मिळतो. दगड खाणीतील हा दगड ठराविक खोलीनुसार वापरण्यास योग्य समजला जातो. साधारणतः २० फुटांखालील दगड वापरण्यास नरम लागतो. त्यामुळे त्यास मागणी कमी असते. मात्र, अलीकडे घरबांधणीसाठी मोठ्या प्रमाणात जांभा दगडाचा वापर केला जात आहे.
श्री.विकास लिंबाजी चव्हाण, खान व्यावसायिक