Home latest News आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पोलिसांची तत्पर कारवाई; समाजात शांतता व सलोख्याचे आवाहन

आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पोलिसांची तत्पर कारवाई; समाजात शांतता व सलोख्याचे आवाहन

20

गोंदिया (09/05/2026):- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या प्रकरणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलिस प्रशासनाकडे निवेदन सादर करून आरोपी गौरेश बावनकर (वय 50 वर्ष), मु. कोसमतोंडी, ता. सड़क अर्जुनी याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेत संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.आंबेडकरी विचार मंच, जिल्हा गोंदिया तसेच विविध गावांतील समाजबांधवांच्या वतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांना निवेदन देण्यात आले. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह लिखाणामुळे समाजातील भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून, अशा प्रकारांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने भारतीय न्याय संहिता कलम 299, 302 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1) (u) व 3(1) (v) अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी गौरेश बावनकर याला अटक करण्यात आली असून 14 दिवसाच्या एमसीआर मध्ये भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरी विभागाचे SDPO पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून डुग्गीपार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश वणारे यांचेही सहकार्य लाभत आहे.या प्रसंगी पोलिस प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. धार्मिक भावना दुखावणारे, जातीय तेढ निर्माण करणारे किंवा समाजात द्वेष पसरवणारे कोणतेही संदेश, पोस्ट किंवा प्रतिक्रिया टाळाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या कृत्यामुळे संपूर्ण समाजाला दोष देऊ नये, असेही प्रशासनाने नमूद केले.

जिल्ह्यातील विविध जाती-धर्मातील नागरिकांनी शांतता, बंधुता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची भूमिका घेतली असून, संविधानिक मूल्यांवर आधारित ऐक्य टिकवून ठेवणे हीच काळाची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.