आज जागतिक लोकसंख्या दिन: 11 जुलै, “वाढती लोकसंख्या रोखण्याची गरज”

✒साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज
9309747836
देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी लोकसंख्या व तिची गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक मानले जातात,कोणत्याही देशासाठी लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे,
११ जुलै १९८७ रोजी युगोस्लाव्हिया येथे एका बालकाचा जन्म झाला, आणि बरोबर जगाची लोकसंख्या ५०० कोटी इतकी झाली, त्या बालकाचे कौतुक ही मोठ्या प्रमाणात करण्यात आले आणि त्याच दिवसापासून ११ जुलै हा “जागतिक लोकसंख्या दिन” म्हणून साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून जगात लोकसंख्या वाढीचे कारणे आणि दुष्परिणाम यांची माहिती करून घेऊन त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे,
आपापल्या राष्ट्रातील लोकसंख्या नियंत्रित ठेवावी, म्हणून या दिवसाला लोकसंख्येचा विस्फोट”,किंवा” लोकसंख्या इशारा दिन” म्हणून ही ओळखले जाते.
त्या निमित्ताने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक योजनाची काटेकोरपणाने अंमलबजावणी झाली पाहिजे, संपूर्ण जबाबदारी सरकारनीच घेतली पाहिजे, असे आपण सहजपणे म्हणतो, पण समाजातील लोकांनी ही लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे तेवढेच आवश्यक आहे, शासन आणि समाज एकाच रथाची दोन चाके आहेत त्यांच्या परीने शासन अनेक उपक्रम राबवीत आहेत. त्या उपक्रमाना समाज किती प्रमाणात सहकार्य करतो. याचा ही विचार होणे आज गरजेचे होऊन बसले आहे. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले, त्या काळात लोकसंख्या बद्दल राबविण्यात आलेली धोरणे आज अपुरी पडताना सर्वत्र दिसून येत आहेत, वाढत्या लोकसंख्येमुळे मानवाला जमीन व पाणी पुरेनासे झाले आहे.
जगाची लोकसंख्या याच वेगाने वाढत राहिली तर आगामी काही वर्षांत मानवाला पृथ्वीवर राहणे अवघड होईल यासाठी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे.
लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी वाढली आहे त्यामुळे अवैध धंद्यांना तेजी मिळत आहे. हे सर्व रोखण्यासाठी केवळ कायद्ययाने लोकसंख्यावाढ थोपवता येणार नाही, त्यासाठी समाज प्रबोधनातून समाज परिवर्तन होणे अगत्याचे आहे,त्यासाठी वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी तातडीने सर्व स्तरातून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
लोकसंख्या म्हणजे काय, तर “लोकसंख्या म्हणजे एखाद्या भोगोलिक प्रदेशात राहणा-या व्यक्तीची संख्या होय. “लोकसंख्येची गणना दर दहा वर्षांनी केली जाते, त्या गणनेला” जनगणना” किंवा “खानेसुमारी “असेही म्हणतात.
इ : स २०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२५ कोटी होती. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १७,५ टक्के लोकसंख्या भारतात राहते. आज चीन प्रथम क्रमांकावर व भारत द्वितीय क्रमांकावर आहे. अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील आणि जपान या पाच देशाची लोकसंख्या एकट्या भारताएवढी आहे. हे आपले भूषण नसून दूषण आहे. जगातील प्रत्येक सहा व्यक्ती मागे एक भारतीय व्यक्ती आहे. लोकसंख्या अशाप्रकारे वाढत राहिली तर सन २०३० पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून सर्वत्र ओळखला जाईल, असा अंदाज आहे.
१६ एप्रिल १९७६ मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण मांडण्यात आले, त्यानुसार योग्य कायदा करून विवाहासाठी मुलीचे वय १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्ष ठरवण्यात आले तरुण-तरूणींना आपल्या जबाबदा-या समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांना लैंगिकता आणि उशिरा विवाह करण्या संबंधीची तपशीलवार माहिती देण्याची अत्यंत आवश्यकता आहे, लोकसंख्या वाढीमुळे आर्थिक विकासाला बाधा पोहोचत आहे. लोकसंख्येत होणारी वाढही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब आहे, आजही आपल्या देशात दर एक मिनिटांनी ५१ बालके जन्माला येतात, तर दर एक तासाला ३०६० बालके जन्म घेतात, त्यामुळे आतापासूनच लोकसंख्याा वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक ती पाउले उचलण्याची गरज आपल्याला निर्माण झाली आहे,वाढती लोकसंख्या’ टंचाई’ ला आपल्या सोबत घेऊन येते.
अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता, रूढी व परंपरा, वाईट चालीरीती समाजामध्ये आजही पसरल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढतच आहे, वाढती लोकसंख्या हे दारिद्र्याला आमंत्रण देत असते, पोटार्थी लोक शहराकडे जात असतात, खेडी त्यामुळे ओस पडतात,
मुलगा हाच एकमेव “वंशाचा दिवा” आहे म्हणून मुलगा होईपर्यंत काही जण कुटुंब नियोजन करत नाहीत. जर मुलगा झाला नाही तर स्वत: दुसरा विवाह काही जण करतात, कारण मृत्यू झाल्यावर पाणी पाजण्यासाठी व संपत्तीला वारस ठेवण्यासाठी मुलगाच हवा, वार्धक्यात ‘आधारकाठी ‘म्हणून मुलालांच जास्त प्राधान्य देताना दिसून येतात, तसेच “मुलगी हे परक्याचे धन “आहे, असे समजून लोकसंख्या वाढत जाते. गैरसमजुती व अज्ञानामुळे माहिती देऊन देखील त्याचा वापर केला जात नाही. ग्रामीण भागात बालमृत्यूचे व अर्भक मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने अनेक मुलांना जन्म दिला जातो,कुटुंब नियोजन करणे हे महापाप आहे, असेही म्हटले जाते,वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून देखील त्या ग्रामीण भागात पोहोचत नाहीत त्यामुळे त्यांना कुटुंब नियोजनाच्या साधनाची माहिती असूनही त्या मिळत नसल्याने लोकसंख्या वरचेवर वाढत जाते त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील स्त्री-पुरुषामध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे, दोन मुलांपेक्षा जास्त मुले असतील तर मोठा दंड करुन शासकीय लाभापासून वंचित ठेवून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली पाहिजे, गरजेपेक्षा जास्त लोकसंख्या वाढल्याने आपला देश व जगाला याचे दुष्परिणाम भोगावे लागतीलच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कुटुंब नियोजनाचे योग्य ज्ञान नसल्याने हे लोक दोन पेक्षा जास्त अपत्य जन्माला घालतात व त्यांना मुलाकडून आर्थिक मदत हवी असते, कमी वयात बालमजूरी व इतर श्रमाच्या कामावर लावून दिले जाते त्यामुळे लोकसंख्या अपोआप वाढत जाते, लोकसंख्या वाढल्याने देशात असलेल्या पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक संसाधनावर दबाव पडतो. तसेच पेट्रोल, वीज, पाणी, वाहतूक या महत्त्वाच्या सुविधा वर परिणाम होतो. आणि अन्न, वस्त्र निवारा, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा ही काही अंशी अपु-या पडताना दिसून येतात.
अशीच लोकसंख्या वाढत राहिली तर बेरोजगारी वाढेल, हाताला काम मिळणार नाही. त्यामुळे उपासमार होईल आणि तरुण वर्ग नैराश्य पोटी कोणत्याही थराला पोहोचेल हे सांगता येणार नाही. म्हणूनच लोकसंख्या वर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
अमेरिका व युरोपियन खंड त्यांच्या लोकसंख्येला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात, कारण त्यांची लोकसंख्या कमी आहे, डेन्मार्क व स्वीडन या देशातील नागरिक जगातील सर्वात आनंदी मानले जातात, कारण त्यांची लोकसंख्या फारच कमी आहे,
आणि भारताची लोकसंख्या भरमसाठ वाढतच आहे, ती जर अशीच दिवसेंदिवस वाढत राहिली तर निसर्गाचे संतुलन बिघडून जाईल, वृक्षतोडी मुळे ऑक्सिजन कमी होऊन जमिनीची धूप वाढते, सध्या कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजन साठी कितीतरी व्यक्ती तळमळ करीत होते, म्हणूनच संत तुकाराम महाराजानी वृक्षांना सोयरे म्हटले आहे,यासाठी वृक्षाचे महत्त्व किती आहे, हे आपणास कळून चुकले आहे, म्हणून वृक्ष तोडल्या मुळे मृदेची अवनती होते, पर्यायी जंगली प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात,जंगले नाहीसे झाल्याने पाऊस कमी प्रमाणात पडतो, व जास्त लोकसंख्या असल्या मुळे अन्नधान्य कमी पडू लागते, त्यामुळे लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे आवश्यक आहे, संत रामदास स्वामींनी लोकसंख्या वाढीचे गांभीर्य ओळखून एका श्लोकात म्हटले आहे,
“एक हाती एक कटी।
एक पाठी, एक पोटी, ।।
संसारामध्ये झाली दाटी।
काय करावे सुचेना।।
लेकुरे उदंड जाहली।
तो ते लक्ष्मी निघून गेली।।
बापुडे भीकेस लागली।
अन्न खायला मिळेना,।। ”
अशाप्रकारे त्या काळात स्वामींजीनी लोकसंख्या वाढी बद्दल किती भयानक परिस्थिती निर्माण होते ते त्यावेळी लिहुन ठेवले आहे, शासनाने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत,वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी जनजागृती केली पाहिजे, काही घोषवाक्य समाजातील निरक्षर व अंधश्रद्धाळू लोकांसमोर वाचून दाखवले पाहिजेत,
१) ‘करू कुटुंबाचे नियोजन। आनंदी राहू प्रत्येक जण।।
२) छोटे कुटुंब । सुखी कुटुंब ।।
३) जनसंख्या थांबवा। विकास वाढवा
४) मोठे कुटुंब । दु:खी कुटुंब।।
५) धरू नका मुलाची आशा। डोळयासमोर ठेवा पी, टी, उषा ।।
म्हणून लोकसंख्या वाढीवर पथनाट्ये, गावातील चावडीवरून चर्चा करून भिंतीवरुन घोषवाक्य लिहुन शासकीय बसवर, प्राथमिक आरोग्य केंद्रातून, शाळेतून, समाज मंदिरातून, वाचनालय, महाविद्यालय, नाटकातून, चित्रपटातून, कीर्तनातून, दीपावली अंकातून समाज प्रबोधन करता येईल, केंद्र सरकार व राज्य सरकारने शिक्षण विषयक संयुक्त धोरण राबवून शालेय व महाविद्यालय स्तरावर लोकसंख्या शिक्षण हा विषय सक्तीचा करावा, जगातील सर्वच लोकांना लोकसंख्या वाढीच्या संकटाची जोखीम जोपर्यंत ओळखता येत नाही, तोपर्यंत लोकसंख्या कमी होणे शक्य नाही, फक्त लोकसंख्या दिन साजरा करून आपल्या देशाची लोकसंख्या कमी होणार नाही, त्यासाठी अतिशय कठोरपणे पाऊले उचलावी लागतील, ही आपल्या प्रत्येकाची सामाजिक व सामूहिक जबाबदारी आहे, लहान कुटुंबाचे महत्त्व सर्वाना उमगले पाहिजे, तेव्हा सर्व समस्याचे मूळ असलेला लोकसंख्यावाढीचा प्रश्न सुलभ पणे सुटेल, नाही तर लोकसंख्या वाढीचा भस्मासूर आपल्या सर्वांना एकेदिवशी गिळंकृत करेल.