चरस तस्करीचे नेपाळी कनेक्शन; रॅकेटचा पर्दाफाश
13 जणांविरोधात गुन्हा दाखल; साडेतेरा लाखांचा साठा जप्त
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मुरूड व काशीद येथील पर्यटनस्थळी अवैधरित्या चरस विक्रीचा अवैध धंदा चालविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. मुरूड पोलिसांसह रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली. 13 लाख 61 हजार रुपये किमतीचा चरसचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये मुरूडमधील आईस्क्रीम विक्रेता आणि घोडेवाल्याचा समावेश आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला नेपाळमधून अटक करण्यात आले आहे. मुरूड, काशीदमधील चरस विक्री, वाहतुकीचे कनेक्शन नेपाळशी असल्याचे उघड झाले आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी चालू होती. ठिकठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात होती. रायगड पोलीस दलातील मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिघ्रे येथे तपासणी नाक्यावर पोलीस हवालदार हरी मेंगाळ नाकाबंदीला होते. 29 जूनला मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असताना समोरून एक स्कूटर आलेली दिसली. चालकाच्या वाहन चालविण्यावरून पोलिसांना संशय आला. त्याचवेळी दुचाकी चालकाच्या मागे बसणारा एकजण चालत्या दुचाकीवरून उडी मारून तेथून पसार झाला. या प्रकारामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी दुचाकी थांबवून चालकाची चौकशी केली. त्याच्या बोलण्यामध्ये गडबड गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडीमध्ये 776 ग्रॅम वजनाचा चरस नावाचा अंमली पदार्थाचा साठा सापडला. याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, पोलीस हवालदार जनार्दन गदमले, हरि मेंगाळ, पोलीस नाईक किशोर बठारे, पोलीस शिपाई अतुल बारवे, विशाल पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले. दुचाकी चालक अलवान दफेदार याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. चरस वितरण करण्यापासून वाहतूक करणे, वितरण करण्यासाठी देखरेखीवर असणारे अशा अनेक जणांची माहिती घेऊन त्यांना पकडण्यास सुरूवात केली. गेल्या 12 दिवसांमध्ये 13 जणांना अटक करण्यास या पथकाला यश आले असून, त्यांच्याकडून दोन किलो 659 ग्रॅम वजनाचे 13 लाख 61 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यात अलवान दफेदार, विशाल जैसवाल, अनुप जैसवाल, अनुज जैसवाल, आशिष डिगे, प्रणित शिगवण, आनस कबले, वेदांत पाटील, साहिल, नाडकर, अनिल पाटील, सुनील शेलार, राजू खोपटकर, खुबी भगेल या आरोपींचा समावेश आहे. 18 पासून 27 वर्षांपर्यंतचे नऊ आरोपी आहेत. काशीद, मजगाव, पेठ मोहल्ला, गावदेवी पाखाडी, मुरूड, कल्याण, उत्तर प्रदेश येथील हे आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेपाळ, मध्य प्रदेशमध्ये धागेदोरे
रायगड जिल्ह्यातील मुरूड व काशीद हे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच स्थानिक पर्यटक येतात. या पर्यटकांसह काही स्थानिकांना चरस विकण्याचा प्रकार चालविला जात होता. त्या परिसरातील घोडेवाले आणि आईस्क्रीम विक्रेत्यांच्या मदतीने चरसची विक्री, वाहतूक व वितरण सुरु होते. या गुन्ह्यातील विशाल जैसवाल हा आरोपी मुख्य वितरक असून, नेपाळ आणि मध्य प्रदेशमधून चरस आणून ते या परिसरात विकत होता. आशिष डगे व प्रणित शिगवण या स्थानिकाच्या मदतीने चरस विकला जात होता.
चोरीच्या गाडीतून चरसची वाहतूक
स्कूटरमधून चरसची वाहतूक करण्यात आली होती. ती स्कूटर पोलिसांनी जप्त केली. स्कूटरची माहिती घेतल्यावर ती स्कूटर चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. आणखी काही दुचाकी चोरीला गेल्याचे या तपासात उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी व्यक्त केली आहे.
पोलीस अधीक्षकांचे युवकांना आवाहन
जिल्ह्यात चरस, गांजा आदी अंमली पदार्थ विक्री, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडसत्र सुरू केले आहे. वाहतूक विक्री कणाऱ्यांना मदत करणाऱ्यांनादेखील गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे. युवकांनी अंमली पदार्थाच्या आहारी न जाता, सतर्क राहणे गरजेचे आहे. काही असा अनुचित प्रकार उघड झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले.
वर्षभरापासून करत होता तस्करी
विशाल जैसवाल हा आरोपी गेल्या 2024 पासून चरस तस्करीचा व्यवसाय करीत होता. नेपाळ येथून तो चरस आणून मुरूड तालुक्यात विकत होता. अनुप जैसवालच्या माध्यमातून ठिकठिकाणी चरसची विक्री केली जात होती. विशाल नेपाळला पळून गेला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गेले अनेक दिवस मध्य प्रदेशमध्ये होते. अखेर नेपाळ पोलिसांसह स्थानिक पोलिसांच्या मदतीने विशालला नेपाळ येथून अटक करण्यात आली आहे.