मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बाळंतपण, वसई स्टेशनात ‘मुलगी झाल्याची झाली ‘अनाऊन्समेंट’

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बाळंतपण, वसई स्टेशनात ‘मुलगी झाल्याची झाली ‘अनाऊन्समेंट’

मुंबईच्या लोकल ट्रेनममध्ये बाळंतपण, वसई स्टेशनात 'मुलगी झाल्याची झाली 'अनाऊन्समेंट'
मुंबईच्या लोकल ट्रेनममध्ये बाळंतपण, वसई स्टेशनात ‘मुलगी झाल्याची झाली ‘अनाऊन्समेंट’

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- ऑफिस गाठणाऱ्यांची वसई स्टेशनात रोजच्या प्रमाणेच बुधवारीही धावपळ सुरू होती. या घाईगर्दीत विरार-दादर ही सकाळी 6.18 ची लोकल वसई स्टेशनात येताच एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. पण योगायोग म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन हिची प्रसूती केलेल्या नर्स तसेच इतर आणखी दोन नर्स याच डब्यात असल्याने त्यांच्या मदतीने हे बाळंतपण सुखरूप पार पडले.

विरारहून सुटलेली लोकल वसई स्टेशनात येताच काही महिला मोटरमनच्या केबिनच्या दिशेने धावल्या व त्याला गाडी थांबवून ठेवण्याची विनंती केली. कारण होते ते लेडीज फर्स्ट क्लासच्या डब्यात एका महिलेला प्रसूतीकळा सुरू होत्या. ही महिला आपल्या आईसोबत बोरीवलीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी निघाली होती. तिला लोकलमधून हलवून वसईतील एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासारखीही परिस्थिती नसल्याने ट्रेनमधील महिला तिच्या मदतीला पुढे सरसावल्या. योगायोगाने याच डब्यात रॉनी बेबी, रोशनी भुवड आणि अश्विनी खानविलकर अशा चक्क तीन नर्स होत्या. दस्तुरखुद्द ऐश्वर्या बच्चनच्या प्रसूतीच्या वेळी शुश्रुषेसाठी रॉनी उपस्थित होत्या. अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कामास असलेल्या रॉनी व इतर दोन नर्सनी इतर महिला प्रवाशांना साथीला घेत त्या महिलेचे बाळंतपण सुखरूप पार पाडले. रॉनी यांनी बाळाची नाळ कापली आणि आईच्या कुशीत सोपवले.

25 मिनिटे लोकल वसई स्टेशनातच थांबवून ठेवण्यात आली होती, मात्र गाडी सुटायला उशीर झाल्याबद्दल एकाही प्रवाशाची तक्रार नव्हती. तिकडे ‘मुलगी झाली’ची बातमी येताच वसईच्या प्लॅटफॉर्मवर जल्लोष पसरला. मुलीच्या जन्माचा आनंद सगळे साजरा करीत होते. त्यानंतर प्रसूतीनंतर पुढील सोपस्कारांसाठी बाळ-बाळंतीणीला वसईतील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि इकडे गाडी सुटली.