अमरावती पालकमंत्र्यांचा अतिवृष्टीग्रस्त भागात दौरा, नुकसानभरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करावे पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर
🌐पंचनामे तत्काळ पूर्ण करा प्रत्येक नुकसानीची तपशीलवार नोंद घ्या एकही पात्र व्यक्ती वंचित राहु नये

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अमरावती : – जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे तत्काळ त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. तिवसा तालुक्यातील शिवणगावकडे येणाऱ्या सुर्यगंगा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी श्रीमती ठाकूर यांनी केली.
तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, गटविकास अधिकारी चेतन जाधव,उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तिवसा मंडळ कृषी अधिकारी अरुण गजभिये, मार्डी मंडल कृषी अधिकारी विलास केचे आदी उपस्थित होते.
शिवणगाव येथील पावसाने पडझड झालेल्या घराची पाहणी त्यांनी यावेळी केली. शिवणगाव येथील पावसामुळे नुकसान झाल्याबाबतचे 218 पंचनामे झाले असून 904 हेक्टर वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याचे वैभव फरतारे यांनी सांगितले. सुर्यगंगा नदीवरील पुलामुळे अतिवृष्टीत अनेकदा गावाशी संपर्क तुटतो, या पुलाची उंची वाढविण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहीद गणेश नेमाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मारक परिसराचे सौंदर्यीकरण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.
भिवापूरच्या पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावे
भिवापूर येथे पावसामुळे नाल्याकाठची जमीन खरडल्या गेली आहे. यावरील 130 हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती व अंदाजे 15 शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून निघाली अशी माहिती वैभव फरतारे यांनी श्रीमती ठाकूर यांना दिली. पंचनामे तात्काळ पूर्ण करावे. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहू नये असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.
तिवसा तालुक्यातील भिवापूर येथे मुसळधार पावसामुळे धरणातील अतिरिक्त पाणी भिवापूर कडे जाणाऱ्या पुलावरून वाहते, त्यामुळे खचलेल्या या पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे, असे कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य यांना सांगितले.
पावसामुळे रस्ते व वाहतूक बंद होऊ नये, तसेच गावाचा संपर्क तुटू नये यासाठी कुऱ्हा ते बोर्डा येथील मार्गाचे खोलीकरण योग्य पद्धतीने करावे. पावसामुळे विदुयत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी या मार्गावर असलेल्या तीन विदुयत खांबावरील रोहित्राची उंची वाढविण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी महावितरणचे राजेश पाटील यांना दिले.
मौजा चेनुष्टा व बोर्डा येथे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे झालेले नुकसानीची पाहणी श्रीमती ठाकूर यांनी केली. येथील नुकसानीच्या संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश त्यांनी दिले असून त्यानंतर झालेल्या नुकसानी बाबत तपशीलवार नोंदणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले.