विद्यापीठाच्या परीक्षा ओळखपत्रात घोळ; अनेक विषयांची नावे छापलीच नाही

68

 

विद्यापीठाच्या परीक्षा ओळखपत्रात घोळ; अनेक विषयांची नावे छापलीच नाही.

विनायक सुर्वे प्रतिनिधी

वाशीम – कोरोनामुळे लांबलेल्या परीक्षा आता मार्गी लागल्या आहेत. अनेक विद्यापीठांनी परीक्षांचे नियोजन सुरू केले आहे. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक अडचणी येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा १२ ऑक्टोबरपासून (सोमवार) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या ओळखपत्रामध्ये घोळ झाल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी दिल्या गेलेल्या ओळखपत्रामध्ये काही विषयांची नावेच नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा प्रश्न रेंगाळत होता. त्यावर तोडगा काढत आता परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. या सोमवारपासून परीक्षा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून ओळखपत्र पाठवण्यात आले. मात्र, त्या ओळखपत्रांमध्ये नमूद असलेल्या विषयांमध्ये काही विषयांची नावेच छापली नाहीत. त्यामुळे त्या विषयाचा पेपर होणार की नाही, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.