नागपूर तांदूळ काळाबाजारीचे तार भंडारा-गोंदियातही

सरकारी धान्याची काळाबाजारी करणारा कुख्यात चेतन अर्जुन मदान आणि त्याच्या साथीदारांचे तार भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील अनेक राईस मिल मालकांशी जुळले आहेत.

बाजूच्या राज्यातही पाठविला जातो तांदूळअनेक महिन्यांपासून रॅकेट सक्रिय

नागपूर : सरकारी धान्याची काळाबाजारी करणारा कुख्यात चेतन अर्जुन मदान आणि त्याच्या साथीदारांचे तार भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील अनेक राईस मिल मालकांशी जुळले आहेत. त्यांच्या माध्यमातून ही मंडळी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सरकारी तांदळाची गैरमार्गाने मोठी खेप पोहचवत असतात, अशीही माहिती पुढे आली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने चेतन मदान याच्या फ्री ऑक्ट्रॉय झोनमधील गोदामावर गुरुवारी छापा घालून ४० टन तांदूळ जप्त केला. तेथून चार वाहनांसह सात आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने हे प्रकरण लकडगंज पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करून एक दिवसाचा पीसीआर मिळवला.

गुरुवारी हा गोरखधंदा पोलिसांनी उघड केला. लॉकडाऊनच्या कालावधीत गोरगरिबांना सरकारकडून अल्प किमतीत आणि मोफत दिला जाणारा तांदूळ मदान, गुनीयानी, जुनेजासारखे भ्रष्ट दलालाच्या माध्यमातून सात ते आठ रुपये किलोने विकत घेतात. त्या तांदळाला पॉलिश केल्यानंतर नामांकित ब्रॅण्डच्या पोत्यात हा तांदूळ भरला जातो. त्यानंतर हा तांदूळ भंडारा, गोंदिया व तेथून छत्तीसगड, मध्यप्रदेशात पाठविला जातो.

अशा प्रकारे सरकारने गरिबांना वाटलेल्या तांदळाची पद्धतशीर खुल्या बाजारात विक्री करून लाखो रुपये कमविले जाते. हे रॅकेट नागपुरात अनेक महिन्यांपासून सक्रिय असून अन्नधान्य वितरण प्रणालीतील काही भ्रष्ट मंडळींची त्यांना साथ आहे. त्यामुळे हे रॅकेट दरदिवशी लाखोंचे वारेन्यारे करते. पहिल्यांदाच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली. आरोपी चेतन अर्जुन मदान, श्रीकांत रजनीकांत कक्कड, उमेश बितेलाल शाहू, मोहम्मद रियाज मोहम्मद कदिर, अक्रम खान अहमद खान, प्रदीप प्रभाकर काजवे आणि विक्की गणेश जगदाळे अशा सात जणांना अटक केली. या कारवाईमुळे संबंधितात खळबळ निर्माण झाली. मात्र, अनेक बडे मासे निसटून जाण्यात यशस्वी ठरल्यामुळे ही खळबळ तात्पुरतीच ठरली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here