महाराष्ट्र बंदला काही ठिकाणी गालबोट; ठाण्यात रिक्षा चालकांना मारहाण.
विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. : 9768545422
ठाणे :- उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी राज्यभरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसतर्फे बंद पाळण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही ठिकाणी या बंदला गालबोट लागल्याचे दिसून आले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील दिग्गज नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर तिन्ही पक्षाच्या संगनमताने या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनेही आज महाराष्ट्र बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर पक्षाचे झेंडे घेऊन उतरले. राज्यातील अनेक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकाने बंद ठेवण्यात आली. मात्र, काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद केली. ठाणे जिल्ह्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून रिक्षा चालकांना मारहाण आणि दादागिरी करत रिक्षासेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर काही जिल्ह्यात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे शांततापूर्ण जाहीर केलेल्या महाराष्ट्र बंदला काही ठिकाणी गालबोट लागल्याचे दिसून आले.
काय आहे लखीमपूर खीरी प्रकरण ?
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांनी केंद्रीयमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या शेतकरीविरोधी वादग्रस्त वक्तव्याविरोधात २९ सप्टेंबर रोजी निषेध मोर्चा काढला होता. त्यावेळी समाजकटंकानी आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालत त्यांना चिरडलं. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला. यात ४ शेतकऱ्यांचा सामावेश होता.