कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरात सापडले तांब्याचेही साठे

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

कोळशासाठी प्रख्यात असणाऱ्या चंद्रपूरची ओळख ‘ब्लॅक गोल्ड’ सिटी अशी आहे. पण आता या जिल्ह्यातील काही भागात तांबे खनिजाचे विपूल साठे असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी खाण प्रकल्प उभारणीबाबत ठोस पावले उचलली गेल्यास तांब्याची खाण असणारा चंद्रपूर राज्यातील पहिला जिल्हा ठरणार आहे.

पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया व यवतमाळ ही खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र आहेत. नागपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी तांबे आढळून येत होते. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात तांबे उत्खननाच्या संभाव्यतेचा शोध प्रशासन घेत असल्याची माहिती खाण विभागातील सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील ठाणेवासना, गोंडपिपरी तालुक्यातील दुबारपेठ, चिमूर तालुक्यातील लावरी आणि अडेगाव-मोटेगाव येथे तांब्याच्या खनिजाचे मोठे साठे आढळून आले आहेत. ‘जिओलॉजी अॅण्ड मायनिंग’ आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) यांच्या मदतीने ठाणेवासना आणि दुपारपेठ येथील तांब्याच्या साठ्यांचा प्राथमिक शोध पूर्ण झाला आहे. लावरी आणि अडेगाव-मोटेगाव ब्लॉक्सचा शोध सुरू आहे. ठाणेवासना आणि दुपारपेठ येथील तांबे उत्खननाच्या संभाव्यतेची माहिती देणारा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार करून सरकारकडे पाठविण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाच्या अहवालाच्या आधारे बहुराष्ट्रीय खाण क्षेत्रातील प्रमुख एका खासगी कंपनीने दोन्ही ब्लॉक खाणकामासाठी घेण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करून हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांच्या मते, कंपनी दोन्ही ब्लॉक्सचा आणखी शोध घेत आहे आणि त्यांची व्यावसायिक व्यवहार्यता तपासल्यानंतर खाणकामाबाबतची प्रक्रिया पुढे जाईल. कंपनीने प्रकल्प पुढे नेल्यास व्यावहारिक खाणकाम सुरू होण्यास मात्र सुमारे सहा वर्षे लागतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्हा खनिज संपत्तीने समृद्ध आहे. राज्य सरकार आमच्या विभागामार्फत जिल्ह्यातील विविध खनिजांच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचे व्यावसायिक एकीकरण करण्यासाठी व्यापक संशोधन करत असल्याचे नैताम म्हणाले. तांबे हा निसर्गात आढळणारा विद्युतसुवाहक धातू आहे. तांबे धातू मृदू, तन्यक्षम आणि विद्युत व उष्णतेचा सुवाहक आहे. तांब्याचा उपयोग विद्युत वाहिन्यांमध्ये, उष्णतावाहकांमध्ये, आभूषण व अलंकारांमध्ये आणि घरगुती भांड्यांसाठी होतो. २००५च्या ब्रिटिश भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, चिली हा अव्वल तांबे उत्पादक देश आहे. जिथे जगातील एक तृतीयांश साठा आहे. त्यानंतर अमेरिका, इंडोनेशिया आणि पेरू यांचा क्रमांक लागतो. दिवसेंदिवस वापरात असलेल्या तांबेची मात्रा वाढत आहे. आधुनिक जगात पुनर्वापर हाच तांबेचा एक प्रमुख स्रोत आहे. अ‍ॅल्युमिनियम प्रमाणेच, तांबेही कोणत्याही गुणवत्तेची हानी न करता पुनर्वापरयोग्य होते. लोखंड आणि अ‍ॅल्युमिनियम नंतर तांबे तिसऱ्या क्रमांकाचा पुर्नउत्पादित केलेला धातू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here