“आदिवासी आरक्षणावर घुसखोरी थांबवा!” — पालघर येथे १४ ऑक्टोबरला भव्य आदिवासी बचाव मोर्चा; अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटनेचा निषेध

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी -पालघर
7798185755
कासा :- दि. ११ ऑक्टोबर
अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने आदिवासी समाजाच्या आरक्षण हक्काच्या संरक्षणासाठी राज्यभरात ठोस भूमिका घेतली जात आहे. सध्या धनगर व बंजारा समाज हे अनुसूचित जमातींमध्ये समावेश मिळविण्याची मागणी करत असून, हा प्रयत्न आदिवासी समाजाच्या आरक्षणातील घुसखोरी असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाकडून मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चे काढले जात आहेत. या आंदोलनाला अधिक बळकटी देण्यासाठी आदिवासी बचाव कृती समिती यांच्या मार्फत येत्या १४ ऑक्टोबर रोजी पालघर येथे एक भव्य आदिवासी बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटना या मोर्चात सक्रीय सहभाग नोंदवून धनगर व बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातींत समावेशाच्या मागणीविरोधात तीव्र निषेध व्यक्त करणार आहे. संघटनेचे पदाधिकारी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आदिवासी समाजाच्या आरक्षणात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. हे आरक्षण आदिवासींच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक हक्कांशी निगडित आहे.”
संघटनेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पत्रकार आणि आदिवासी बांधवांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शासनाने धनगर व बंजारा समाजांचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याचा कोणताही प्रस्ताव त्वरित फेटाळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
पालघरमधील हा मोर्चा राज्यातील आदिवासी समाजाच्या हक्कांच्या लढ्याला नवचैतन्य देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








