शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद! धानिवरी येथे एकात्मिक पाणलोट विकास 2.0 अंतर्गत अवजारे वाटप
आधुनिक शेतीसाठी बळ —२१ शेतकऱ्यांना पाॅवर विडर, मळणी यंत्र, मोटार व पीव्हीसी पाईपचे वाटप

अरविंद बेंडगाव
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
डहाणू :- डहाणू तालुक्यातील धानिवरी, देऊर आणि दहीगाव या गावांमध्ये एकात्मिक पाणलोट विकास 2.0 कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभ योजना राबविण्यात आली. या योजनेत शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त पाॅवर विडर, मळणी यंत्र, इलेक्ट्रीक मोटार आणि पी.व्ही.सी. पाईप यांसारखी आधुनिक शेती अवजारे वाटप करण्यात आली.
या योजनेचा लाभ एकूण २१ शेतकऱ्यांना मिळाला असून, यामुळे त्यांच्या शेतीतील उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
या कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी अनिल नरगुलवार, धानिवरी ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश कोरडा, उप कृषि अधिकारी, सहायक कृषि अधिकारी रश्मी घरत, पाणलोट समिती सचिव अंकुश गोरवाला तसेच अनेक मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी अधिकारी व पाणलोट समिती सदस्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नफा कसा वाढवावा, श्रम व खर्च कसा कमी करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “शेती यांत्रिकीकरणामुळे उत्पादनक्षमता वाढते आणि तरुण पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यास मदत होते.”
नव्या यंत्रसामग्रीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामात सोय, वेळेची बचत आणि अधिक उत्पादनाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गावात उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक भौतिक सुविधा, तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक सक्षमीकरण पुरवतो. या योजनेंतर्गत माती व पाणी संवर्धन, सिंचन सुधारणा आणि शेती यांत्रिकीकरण यावर भर दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादनवाढ साध्य होते.
या उपक्रमामुळे धानिवरी, देऊर आणि दहीगाव परिसरातील शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून, ही योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे.
कोट
“ही यंत्रसामग्री मिळाल्यामुळे आमच्या शेतीत नवे युग सुरू झाले आहे. आधी ज्या कामासाठी तासन्तास लागायचे, ती कामं आता काही मिनिटांत पूर्ण होतात. ही योजना आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे.”
दयाजी राज्या पडवले, शेतकरी, धानिवरी








