सीआरपीएफमधील महिला कॉन्स्टेबलचे क्रिडा अधिकारी व प्रशिक्षकांवर बलात्काराचे आरोप

49

सीआरपीएफमधील महिला कॉन्स्टेबलचे क्रिडा अधिकारी व प्रशिक्षकांवर बलात्काराचे आरोप

सीआरपीएफमधील कुस्तीपटू असलेल्या एका महिला खेळाडूने मुख्य क्रिडा अधिकारी व अर्जुन पुरस्कार विजेते खजान सिंग तसेच तिचे प्रशिक्षक सुरजित सिंग यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. खजान सिंग व सुरजित सिंग यांनी मी आंघोळ करत असताना माझे अश्लील फोटो काढले व नंतर त्या फोटोच्या आधारे त्यांनी मला ब्लॅकमेल करून माझ्यावर बलात्कार केला असा आरोप या महिला कुस्तीपटूने केला आहे. त्यांनी इतर काही महिलांवर देखील असे अत्याचार केल्याचे देखील त्या महिलेने सांगितले आहे.

सदर महिला कुस्तीपटूने 3 डिसेंबर रोजी बाबा हरिदास पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत बोलताना सीआरपीएफचे प्रवक्ते मोजेज दिनाकरन यांनी सांगितले की ‘या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून सीआरपीएफकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

खजान सिंग हे सीआरपीएफमध्ये डीआयजी रँकचे अधिकारी असून त्यांनी 1986 मध्ये हिंदुस्थानसाठी सेऊल आशियाई गेम्समध्ये स्विमिंगमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यांच्यामुळे या प्रकारात तब्बल 1951 नंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानने पदक पटकावलेले. खजान सिंग यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ‘हे सगळे आरोप खोटे असून फक्त माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत’, असे खजान सिंग यांनी सांगितले.