मीराबाई चानूचा प्रेरणादायी प्रवास
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो:९९२२५४६२९५
भारताची आघाडीची ऑलिम्पिक पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने कोलंबिया येथे सुरू असलेल्या जागतिक वेट लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाला गवसणी घातली. याआधी २०१७ मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये तिने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते. तिला या स्पर्धेत त्याची पुनरावृत्ती करता आली नसती तरी तिने मिळवलेल्या रौप्यपदकाचे महत्व देखील सुवर्णपदका इतकेच किंबहुना त्याहून अधिक आहे कारण या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच तिच्या मनगटाला दुखापत झाली होती. सप्टेंबरमध्येच तिला मनगटाच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला होता त्यानंतरही तिने जागतिक स्पर्धा अत्यंत महत्वाची असल्याने या स्पर्धेत भाग घेतला होता. अनेकांनी तिला या स्पर्धेत भाग न घेण्याचा सल्ला दिला होता. काहींनी ती मनगटाच्या दुखापतीमुळे देशासाठी पदक मिळवू शकणार नाही असे भाकीत केले होते मात्र मिराबाईला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास होता. या विश्वासाच्या जोरावरच ती या स्पर्धेत उतरली आणि देशासाठी पदक जिंकली.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होतात. ऑलिम्पिक इतकेच या स्पर्धेलाही महत्व असते. जगातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंसमोर खेळताना ते ही दुखापतग्रस्त असताना खेळणे आणि देशासाठी पदक जिंकणे ही खूप मोठी बाब आहे त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो. मीराबाईकडे तो होता त्याच बळावर तिने हे रौप्यपदक जिंकले आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल आणि करून दाखवण्याची जिद्द असेल तर कितीही संकटे आली तर माणूस आपले ध्येय साध्य करू शकतो हेच मीराबाईने दाखवून दिले आहे. अर्थात खडतर परिस्थिती असतानाही देशासाठी पदक जिंकून देण्याची तिची ही पहिलीच वेळ नाही याआधीही तिने असे अनेक पदक जिंकून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. जागतिक स्पर्धेत पदक जिंकायची तिला सवयच झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मागील वर्षी जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्यपदकाची कमाई केली होती. या वर्षी बर्मिंगहम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. २०१८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले हिते. २०१७ सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही तिने रौप्यपदक मिळवले होते. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सातत्याने पदक जिंकणे ही खूप मोठी कामगिरी आहे.
View this post on Instagram
मणिपूर राज्यातील एका छोट्या गावातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. ८ ऑगस्ट १९९४ रोजी मणिपूरमधील एका छोट्या गावात मीराबाई हिचा जन्म झाला. इंफाळपासून तिचे गाव २०० किलोमीटर दूर होतं. त्याकाळी मणिपूरच्याच वेट लिफ्टर कुंजुराणी देवी या स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिम्पिक खेळायला गेल्या होत्या. त्यांचा आदर्श मिराबाईने घेतला आणि सहा भावंडात सर्वात लहान असलेल्या मिराबाईने वेट लिफ्टर बनण्याचा निश्चय केला. २००७ साली जेंव्हा मिरबाईने वेट लिफ्टिंगचा सराव सुरू केला तेंव्हा लोखंडाचा बार नसल्याने बांबूच्या बारने सराव केला. गावात प्रशिक्षणाची सोय नसल्याने गावापासून ५०-६० किलोमीटर अंतरावरील गावात जाऊन प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईकडे, अंडी, मटण, चिकन यासारखा महागडा आहार घेण्यास देखील पैसे नसायचे तरीही तिने सराव सुरू ठेवला. कठोर मेहनत घेतली आणि तिचे फळ तिला मिळाले. अंडर १५ आणि अंडर १७ ची ती नॅशनल चॅम्पियन बनली.
वयाच्या पंधराव्या वर्षांपासून पदक जिंकण्याची तिची सवय आज वयाच्या २८ व्या वर्षीही कायम आहे आणि तिचा फॉर्म आणि जिद्द पाहता ती आणखी काही वर्षे देशासाठी पदक जिंकतच राहणार आहे. आगामी ऑलिंपिक स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे. मीराबाईचा आत्मविश्वास, कठोर मेहनत, जिद्द आणि करून दाखवण्याची धमक पाहता तिचे हे स्वप्न पूर्ण होणार यात शंका नाही. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुली पासून सुरू झालेला तिचा आजवरचा हा प्रवास थक्क करणारा आहे. तिचा हा थक्क करणारा प्रवास नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. मीराबाई चानूचे मनापासून अभिनंदन व तिला तिच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा!