भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांना मारहाण; आरोपींच्या सुटकेसाठी राम कदमांचा फोन.

राज रोकाया प्रतिनिधी

मुंबई:- भाजपचे आमदार राम कदम पुन्हा एका नव्या वादात अडकले आहेत. पोलिसाला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला सोडावे, यासाठी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला त्यांनी केलेला फोन व्हायरल झाला आहे. त्यावरून इतर पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

पवई पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर भाजप आमदार राम कदम यांनी या आरोपींना सोडा, अशी विनंती करणारा फोन मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला केला आहे. राम कदम आणि पोलिस कर्मचारी यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करताना पोलिसांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर यांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी या आरोपींनी गाडीतच पोलीस नितीन खैरमाडे यांना मारहाण केली. या प्रकारानंतर या तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर राम कदम यांनी फोन करुन त्यांना सोडण्याची विनंती केली आहे.

त्यावरून इतर पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी एका चॅनेलशी बोलताना कदम यांना एकदा तुरुगांतच टाका. त्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here