ट्रकच्या चाकाखाली येऊन विद्यार्थिनीचा मृत्यू
ने. ही. महाविद्यालयासमोरील हृदयद्रावक घटना
✍️मनोज आर गोरे✍️
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.9923358970
ब्रम्हपुरी :- तांदूळ भरलेल्या ट्रकच्या मागील चाकात येऊन विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ने.ही. महाविद्यालय समोर घडली. समीक्षा संतोष चहांदे रा. मालडोंगरी वर्ग ११ सायन्स, आंबेडकर महाविद्यालय असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
खोब्रागडे चौक ते आंबेडकर महाविद्यालय परिसरात नेहमीच मोठी वर्दळ असते. अरुंद रस्त्यावरून नेहमी अवजड वाहने धावतात. मुरूम, वाळूची अवैध वाहतूक याच मार्गावरून होत असल्याने ही वाहने भरधाव वेगाने धावतात. तर वखार महामंडळाकडे तांदूळ वाहून नेणारे ट्रक याच मार्गावरून मार्गक्रमण करतात. याच परिसरात ने. ही. महाविद्यालय, ने. ही. मुलींची शाळा, मुलांची शाळा, एल. एम. बी .स्कूल, ख्रिस्तानंद शाळा आहेत. मंगळवार व शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवडी बाजार भरतो. त्यामुळे या दोन्ही दिवशी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कृ. उ. बा. समितीच्या गाळ्यांसमोर अनेकांनी शेड उभारले आहेत. तर अनेकांचे अतिक्रमण रस्त्यावर आले आहे. रस्ता अरुंद असल्याने केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आंबेडकर महाविद्यालयात ११ वी सायन्सची विद्यार्थिनी समीक्षा चाहांदे रा. मालडोंगरी महाविद्यालयात जात होती. तर याच वेळी तांदूळ भरलेला ट्रक क्र. सी. जी.ओबी.ए.ई.९९७२ वखार महामंडळाकडे जात असताना ने.ही. महाविद्यालयासमोर ट्रकच्या मागील चाकात येऊन विद्यार्थिनीचा घटनस्थळीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटांस्थळी दाखल झाले. ट्रक चालकाला ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.