शहीद जवान सुयोग कांबळे यांना नारंगी येथे लष्कराची मानवंदना
हुंदके आणि आठवणीने खारेपाट गहिवरला
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंट मधील हवालदार सुयोग अशोक कांबळे यांना वीरमरण आल्यानंतर त्यांना लष्कराच्या वतीने मानवंदना देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद सुयोग च्या आठवणीने संपूर्ण खारेपाट परिसर हुंदके देत गहिवरला.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात खारेपाटातील चिंचवली नारंगी बौद्धवाडीतील शहीद जवान सुयोग अशोक कांबळे यांना मानवंदना आणि आदरांजली देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान तसेच हजारोंचा जनसमुदाय रविवारी सकाळी जमला होता. लष्कर व शहीद सुयोग कांबळे मित्रमंडळाच्या वतीने कार्लेखिंड ते नारंगीपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. त्यावेळी शहीद जवान अमर रहे..च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, प्रांतअधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सैन्यदलातील अधिकारी, शाळेतील विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती होती. शहीद जवान यांच्यावर फुलांचा वर्षाव करणारा जनसमुदाय तिरंगा हातात घेऊन रस्त्याच्या कडेला उभा होता. या कुटुंबाला आधार देण्यासाठी ५ हजारहून अधिक जनसमुदाय उभा होता. आमदार महेंद्र दळवी यांनी शहीद सुयोग कांबळे यांचे खारेपाटमध्ये भव्य स्मारक उभारणार असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीविता पाटील यांनी केले.