मीडिया वार्ता न्यूज़
शिलाँग :मेघालय विधानसभा निवडणुकीत इटली, अर्जेंटिना, स्वीडन आणि इंडोनेशिया मतदान करून आमदार निवडून देणार आहेत. शिवाय मेघालयाचं सरकार बनविण्यात इटली, अर्जेंटिना, स्वीडन आणि इंडोनेशियाचीच भूमिका महत्वाची ठरणार आहे…काय बसला ना धक्का?…पण ते खरं आहे. इंडोनेशिया, इटली, अर्जेंटिना आणि स्वीडन… तुम्ही समजताय त्या देशांची ही नावे नसून मेघालयातील लोकांची ही नावे आहेत आणि तेच लोक येत्या २७ फेब्रुवारी रोजी नवं सरकार निवडणार आहे.

या निवडणुकीत प्रॉमिसलँड आणि होलिलँड नावाच्या बहिणी आणि त्यांचे शेजारी जेरूसलेमही मतदानात भाग घेणार आहेत. मेघालयातील खासी हिल्स जिल्ह्यातील शेला विधानसभा मतदारसंघातील उमनिऊ-तमर परिसरातील गावांमधील लोकांची ही खास पण हटके नावे आहेत. मेघालयातील अनेक छोट्या-छोट्या गावात ही आश्चर्यकारक आणि गंमतीशीर नावं आढळतात. ती ऐकल्यावर तुमच्या गालावर हसू उमटल्याशिवाय राहणार नाही.
‘मेघालयातील ५० टक्के लोक इंग्रजी शब्दांचे चाहते आहेत. जी इंग्रजी नावे कानाला चांगली वाटतात. ती नावे हे लोक आपल्या नावाशी जोडून घेतात. गंमत म्हणजे त्यांना या नावाचा साधा अर्थही माहीत नसतो,’ असं या विभागाचे प्रमुख प्रीमियर सिंह यांनी सांगितलं. मेघालयातील बांगलादेशाच्या सीमेजवळील एक गावं असंच आहे. या गावात ८५० पुरुष आणि ९१६ महिला मतदार आहेत. या गावात अनेकांची नावे अशीच गमतीदार असल्याचं सिंह म्हणाले.

‘माझे वडील शिकलेले होते. त्यामुळे त्यांनी मला चांगलं नाव दिलं. गंमत म्हणजे माझ्या पदाला साजेसं असंच ते नाव आहे. काहींची नावे संडे आणि थर्सडे सुद्धा आहेत. तर काहींची नावे त्रिपुरा आणि गोवा सुद्धा आहे,’ असं प्रीमियर सिंह यांनी सांगितलं. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मेघालयात मतदान होणार असून ३ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here