जाम-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दोघांचा घटनास्थळीच मृत्यू.
हिंगणघाट :- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालूक्यातील जाम येथे जामकडून नागपूरकडे जाणारी भरधाव कार समोरील वाहनावर धडकली. या भीषण धडकेत कारचा चेंदामेंदा झाल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह कारमधून ओढून बाहेर काढावे लागले. जाम-नागपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी सहा वाजता हा अपघात घडला. अमोल सुभान नगराळे वय 25 रा. मारेगाव, जि. यवतमाळ व नितीन भगत वय 21 रा. कोरा. ता. समुद्रपूर, अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल नगराळे आणि नितीन भगत हे सकाळच्या सुमारास एमएच 31-सीपी 6577 या क्रमांकाच्या कारने जाम नागपूर महामार्गाने जामकडून नागपूरकडे जात होते. कार समोरच अनोळखी वाहन होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार समोरील वाहनावर आदळली. या भीषण धडकेच कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. कारमध्येच दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत अमोल नगराळे आणि नितीन भगत यांना कारमधून बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविले. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
कारमधून मृतांना बाहेर काढण्याकरिता जाम महामागृा पोलिसचे पोलिस निरीक्षण भरत कराळे, उपनिरीक्षक कुमरे, चालक ज्योती गावंडे, दिलीप वांदिले, गौरव खरवडे, बंडू डडमल, श्रीनाथे यांनी सहकार्य केले. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळतीत केली.