मतीमंद मुलीच्या गर्भपातासाठी आईची हायकोर्टत धाव, नागपूर खंडपीठात याचिका दाखल.

नागपूर:- मतीमंद पीडित मुलीच्या गर्भपाताला परवानगी देण्यात यावी अशी मागणी करीत पीडितेच्या आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. तेजस जस्टिस फाऊंडेशनच्या सहकार्याने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मुलीच्या वैद्यकीय तपासणीकरिता तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. तसेच, समितीने येत्या शुक्रवारी सकाळी 10.30 वाजतापर्यंत अहवाल सादर करावा असे सांगितले.
याचिकाकर्ता महिला गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील रहिवासी आहे. त्यांना पाच मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा व दोन मुली मतीमंद आहेत. तर दोन मुले स्वस्थ असून ते मोलमजुरीचे काम करतात. मतीमंद असलेली २५ वर्षांची मुलगी गावामध्ये भटकत असायाची. अशातच ती गर्भवती झाली. याबाबत आशा वर्कर संस्थेच्या माध्यमातून पालकांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पालकांनी मुलीची डॉक्टरांकडे तपासणी केली असता ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे समजले.
परिणामी, पोलिस स्टेशन देसाईगंज येथे अज्ञान आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मुलीला गर्भपात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी पाठविले. पीडित मुलगी 22आठवडे 9 दिवसांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी न्यायालयातून गर्भपातासाठी परवानगी घेऊन येण्यास पालकांना सांगितले. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने न्यायालयात याचिका दाखल करीत मुलीच्या गर्भपातासाठी परवानगीची माणगी केली.