विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद संपन्न

विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद संपन्न

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो 9860020016

अमरावती :- उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद हॉटेल ग्रँड महफिल येथे आज संपन्न झाली.

विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह खुशवाह, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, विभागीय कार्यालयाचे उद्योग सहसंचालक निलेश निकम यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल तसेच जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते यावेळी उद्योजकांसमवेत 32 सामंजस्य करार करण्यात आले. गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत नवउद्योजकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

आपल्या जिल्ह्याची बलस्थाने ओळखून गुंतवणूकीच्या नवनवीन संधी शोधा. उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी अमरावती जिल्ह्याचे वातावरण, येथील भौगोलिक परिस्थिती, दळणवळणाची साधने पूरक आहेत. या बाबींचा लाभ घ्या.अन्य क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत माहिती घ्या व उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्या. उद्योजकांना जेथे निकड आहे, तेथे प्रशासन मदतीसाठी तत्पर असल्याचे श्रीमती सिंघल म्हणाल्या.

अमरावती जिल्हा हा ‘ट्रेडिंग हब’ म्हणून उदयास यावा यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहेत. येथील टेक्सटाइल पार्क ही जिल्ह्याची ओळख आहे. सर्व गुंतवणूकदारांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यांच्या व राज्याच्या विकासाला चालना देण्याचा परिषदेचा उद्देश आहे. नवोद्योजकांनी याचे महत्त्व जाणून गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री कटियार यांनी केले.