उन्हाचा चटका अन्..विजेचा झटका.!

अघोषित भारनियमनामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त.!

उन्हाचा चटका अन्..विजेचा झटका.! अघोषित भारनियमनामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त.!

क्रिष्णा वैद्य
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी/विशेष
9545462500

ब्रम्हपुरी:-दिवसभर उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना महावितरणने रात्रीच्या वेळी भारनियमनचा धक्का देत आणखी त्रस्त करून सोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज रात्री झोपेच्या वेळीच वीज लुप्त होत असून नागरिकांना डासांचा सामना करावा लागत आहे. त्यातच दिवसभर काबडकष्ट करून घरी सुखाची साखर झोप मिळावी याकरिता विद्युत उपकरणे यांच्या सहाय्याने उन्हाच्या बाष्पतेचा चटका बसू नये म्हणून महागाडे विद्युत उपकरणे खरेदी ग्राहकांनी केली. माञ या अघोषित भारनियमामुळे अक्षरशः ग्राहक त्रस्त झाला आहे. ग्राहकामध्ये तीव्र नाराजी होत आहे. महावितरणने भारनियमनाचे कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही. एकंदरीतच या अघोषित भारनियमनामुळे तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात महावितरणविरूद्ध संतापाचे लाट उसळली आहे.
औष्णिक वीजनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोळशाचा तुटवडा भासू लागला असून, त्यामुळे राज्यात सर्वत्र विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे गंभीर प्रश्न एका बाजूंनी ऐकण्यात येतं आहे तर एकाबाजूने कोळशाचा साठा मुबलक प्रमाणात आहे असे दुसऱ्या बाजूने प्रसारमाध्यमांद्वारे ऐकण्यात येतं आहे. मग कोळशाचा साठा मुबलक आहे तर भारनियन कशासाठी.? कारण दिवसागणिक सूर्य आग ओकत असून उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पंखे, वातानुकुलन यंत्रणांसाठी विजेची मागणी वाढली आहे. मागणीच्या प्रमाणात वीज पुरविणे महावितरणला जिकरीचे बनू लागले आहे. “आडातच नाही, तर पोहर्‍यात कोठून येणार,” अशी विजेबाबत महावितरणची अवस्था झाली आहे. ग्रामीण भागात दररोजच रात्रीच्या वेळी बत्ती गूल होऊ लागली आहे. सध्या ग्रामीण भागात धान, मका, मूंग, ऊस, भाजीपाला पिकांना पाणी दिले जात आहे. शेतीसाठी रात्रीच्याच वेळी योग्य दाबाने वीजपुरवठा केला जातो हे जरी सत्य असले तरी या अघोषित भारनियमनामुळे पिकांना उन्हाचा चटका बसून पिके करपायला लागली आहे. मग या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण .? असाही संतप्त खडा सवाल शेतकऱ्यांमध्ये गुंजत आहे. कारण सध्याच्या भारनियमनचा शॉक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर पिकांना पाणी देण्याचा प्रश्न आभासून उभा आहे. शहरापेक्षा विजेचा तुटवडा ग्रामीण भागात निर्माण झाल्याचा परिणाम ग्रामीण जाणवत आहे. काही ठिकाणी दिवसाच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. तर रात्री दहा-अकरा वाजतानंतर दोन ते चार तास वीज गायब होते. ऐन झोपेच्याच वेळी वीज लुप्त झाल्यामुळे नागरिकांची झोपमोड होते. त्याचा लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होतो.
नेमकी रात्रीच्यावेळीच वीज गायब होत असल्याने शिक्षण घेतं असलेल्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही मुलांसह पालकांमध्येही महावितरणविरूद्ध संतापाचे वातावरण आहे.
या अघोषित भारनियनामुळे जनता त्रासू नये या करिता अघोषित भारनियन मुक्त करून नियमित वीज पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा उचलण्यात येईल असा इशारा महावितरण विभागाला भारनियमाला त्रस्त नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here