हे भीमा, एक लढाई बाकी आहे

53

हे भीमा, एक लढाई बाकी आहे

अंकुश शिंगाडे 

मो: ९९२३७४७४९२

संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी अहोरात्र अभ्यास करुन ज्या विचाराला आपली तलवार बनवली, त्याच डॉक्टर बाबासाहेबांनी या विचाररुपी तलवारीचा वापर करुन जे उच्चवर्णीयाविरुद्ध युद्ध लढलं, ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. असं वाटतंय की बाबासाहेब जर झाले नसते तर आज देश स्वतंत्र झाला तरी हा अस्पृश्य समाज कधीच स्पृश्यांच्या बरोबरीने चालू शकला नसता. त्यांंनी सुधारणा केल्या नव्हे तर संविधान लिहिलं. आम्हाला आमच्यावर झालेला अत्याचार दूर करण्यासाठी तसेच आमच्यावरचा अन्याय संपविण्यासाठी. तरीही आज समाजावर अन्याय होतो, अत्याचारही होतच असतो. ह्यासाठी लढावी लागेल एक लढाई. जी लढाई बाबासाहेबांशिवाय कोणीच लढू शकत नाही.

          आजही कळत नकळत गावागावात जातीजातीत भेदभाव आहे. लोकं दाखवत नाहीत. पण प्रत्यक्ष त्यांच्या विचारातून कळतो हा भेदभाव. कोणी बोलून अपमानही करतात. पण मजबूरीनं आम्ही प्रत्येकवेळी अनुभवाला येवूनही बोलू शकत नाही. चुपचाप सहन करतो. कारण आमचेच भाऊबहिण आज आमच्याच विरोधात असतात. ते आम्हाला खोटं ठरवतात आणि त्या उच्च जातींना खरं ठरवून मान देतात. उच्च करतात.

            अस्पश्यांंचा कैवारी समजलं जातं आजही बाबासाहेबांना. बाबासाहेबांंची जयंतीदिनी आणि महापरीनिर्वाण दिनी आठवण केली जाते. ज्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी मेल्यावर भुतदया मानायची नाही. तरीही आज त्यांची आठवण करतांना प्रत्यक्ष हार टाकून काही महाभाग नारळंही फोडतात. हे डॉक्टर बाबासाहेबांना मान्य नव्हते तरीही. त्यांनी माझी आठवण या लोकांनी करावी म्हणून समाजसुधारणा केली नाही, तर माझा समाज सुधारला पाहिजे, त्यांच्या गळ्यातील गाडगा व कमरेचा झाडू जावा यासाठी समाजसुधारणा केली. आज झाडू गेला. गळ्यातला गाडगा गेला. पण समाजसुधारणेचं काय?खरंच समाजसुधारणा झाली काय?याचंं उत्तर नाही असंच आहे. नाही आम्ही सुधारलो. नाही आमची जात सुधारली.

          आज आम्ही एकमेकांच्या विवाहप्रसंगी विवाहसोहळ्यास जातो. एकमेकांच्या हातचे पाणी पितो. एकमेकांच्या घरी उठतो, बसतो. भेदभाव मानत नाही. हे जरी खरं असलं तरी आजही काही लोकं चक्क बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान करतो. ज्या बावीस प्रतिज्ञा आज बाबासाहेबांनी दिक्षा घेतांना घेतल्या, त्या पुर्णपणे पाळल्या जात नाही. पाषाणाचे देव मानणारा नाही. मी त्यांच्या मंदिरात जाणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बावीस प्रतिज्ञेत म्हणतात. परंतू तद्नंतरचा आमचा समाज काय? आजही काही काही मंडळी मंदिरात जातात. कोणी चर्चमध्येही. एवढंच नाही तर जो बौद्ध धम्म वास्तविकतेवर आधारलेला असला तरी त्याला न मानता केवळ स्वार्थासाठी आपला धम्मही बदलवून ख्रिश्चन होतात. ज्या बाबासाहेबांनी म्हटलं की मी देव दानव भूत पिशाच्च मानणार नाही, पण आजही हे भूत अंगात येणे पाहिले तर तेे आमच्याच समाजाच्या अंगात येतात आणि त्या भूतांचे मांत्रीकही आमच्याच समाजातले असून त्यावर उपचार करतात आणि शिकली सवरली मंडळी ही बघ्यांची भुमिका घेवून पाहात असते ते दृष्य. ते तसले भोंदू उपचार स्विकारही करीत असतात. आजही हिच शिकलेली मंडळी याच ठिकाणी चमत्कारावर विश्वास करतात. जो चमत्कार बुद्ध धम्म वा डॉक्टर बाबासाहेब आपल्याला शिकवीत नाही. ह्याच गोष्टीचा फायदा ते उच्चवर्णिय घेत असून ते जेव्हा नागासारखा फणा काढून बोलतात, तेव्हा आमची बोबडी वळते. हे काही बरोबर नाही.

          आजही आपली जात लिहिण्याची प्रथा आहे. शाळेशाळेत जाती लिहिण्याचं बंधन पाळलं जात आहे. काही लोकांनी तर आपल्या जातीही बदलवून टाकल्या होत्या, कारण काय तर आरक्षण. आरक्षणाच्या बैसाख्या वापरण्याची आमची सवय आणि त्या आरक्षणाच्या बैसाख्या आम्ही का वापरणार नाही, कारण आजही आमचा समाज सुधारणेच्या कोसो दूर आहे. ज्याला गरज आहे, तो आरक्षण मागत नाही. कारण त्याला आरक्षण म्हणजे काय तेच कळत नाही. पण ज्याला गरज नाही, तोच आरक्षण मागतो. त्यासाठी आमची जात पडताळणी…….कोण ख-या जातीचा. मग आम्ही जात सिद्ध केली. मी मांग, मी चांभार, मी खाटीक, अन् मी अमका तमका. काय मिळवलं जाती सिद्ध करुन. तो पिढीजात धंदा. ती गठाई करायला गठाई कामगारांना टपरी, मांग, खाटकांना धंदे करायला शेड नव्हे तर धंदे टाकायला भांडवल. आम्हाला आमचाच धंदा प्रिय वाटतो. कारण त्यातून जास्त मिळकत मिळते. पण सन्मान………सन्मान मिळतो का पाहिजे तेवढा. आजही ह्याच गोष्टी आपण विचारात घेत नाही. अहो पैसा तर एक वारांगणाही कमविते, पण तिच्या कमवण्याला मोल असते का? याचं उत्तर नाही असंच आहे. आरक्षण मागायचंच आहे तर खुशाल मागावं, पण त्या आरक्षणातून सन्मान मिळावा, जो सन्मान बाबासाहेबांनी मिळविलाय. त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली, ती केवळ शिकता यावं म्हणून. आम्ही शिष्यवृत्ती मिळवतो. परदेशगमन म्हणून. आम्ही सवलती मिळवतो आमचा पिढीजात धंदा वाढावा म्हणून आणि आम्ही आरक्षण मिळवतो केवळ अन् केवळ आमच्या स्वार्थासाठी. आमचं स्वावलंबित्व पुर्ण झालं की बाबासाहेबांसारखी सेवा करणे सोडून, आपल्या बांधवांना वर उचलणे सोडून केवळ आपला स्वतःचा स्वार्थ आम्ही पुर्ण करुन घेतो. समाजसुधारणा दूरच राहिली. कोणी उच्चपदावर चढतात. कोणी राजकारणातही जातात. पण जे जास्त शिकलेले असतात ना, त्यांचा स्वाभिमान पुर्णतः धुळीस मिळालेला दिसतो, जेव्हा ते उच्चवर्णियांचे तळवे चाटतांना दिसतात.

         आम्हाला आमचा हा बालिसपणा नव्हे तर तलवेचाटूपणा संपवायचा आहे. स्वाभिमान जागवायचा आहे. तो जागवायलाच हवा. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे शिका संघटीत व्हा संघर्ष करा. हे ब्रिद पाळायलाच हवे. अन् आम्ही पाळतोही. पण केवळ शिकतो, संघर्ष करतो, पण संघटीत होण्याचं काय? संघटीत होत नाही. आम्ही जर असंच वागत राहिलो तर आम्हाला बाबासाहेबांना विनवणी करावी लागेल आणि म्हणावे लागेल की हे भीमा, अजून एक लढाई बाकी आहे. कारण ही जी जनता आहे. ती जनता तुमच्याशिवाय कोणाचंच ऐकू शकत नाही. आज जो सांगायला जातो, त्यालाच काहीबाही बोलून चूप बसायला लावलं जातं. कारण जी अक्कल शिकवते ती मंडळी अर्ध्या हरकंडात पिवळी झालेली आहेत. ही मंडळी तुमची लेकरं आहेत. ती तुम्हालाच ऐकतील. आम्हाला नाही. म्हणूनच तुम्ही जी समाजसुधारणा करुन गेले. तेवढ्यावरच आम्ही थांबलो आहोत. त्यात कमीत्व आणलं. पण त्या सुधारणात वाढ केलेली नाही. बाबासाहेबांनाही हे ऐकावंच लागेल व काही अंशी बाकी राहिलेल्या समाजसुधारणेसाठी त्यांना यावंच लागेल. पुन्हा जन्म घेवून. ही शेवटची लढाई लढण्यासाठी. त्याशिवाय आम्ही जी जात जात करतो ना. ती जात हद्दपार होणार नाही. तसेच आजूबाजूच्या परीसरात जो काही तुटक्या प्रमाणात विटाळ शिल्लक उरला आहे, तोही दूर होणार नाही.