चायनीज पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच

61

चायनीज पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो ९९२२५४६२९५

भारतीयांना चायनीज गोष्टीचे आकर्षण पहिल्या पासूनच आहे. अगदी चिनी वस्तूंपासून चायनीज पदार्थांपर्यंत सर्वच गोष्टी भारतीयांना आवडतात. त्यातही चायनीज पदार्थांची तर सर्वांनाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हंटले तर बरेच जण चायनीज पदार्थांचाच बेत करतात. मात्र भारतात आणि चीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थात खूप फरक आहे. जिभेला पूरक ठरतील असे चवीचे पदार्थ येथे तयार केले जातात.

रस्त्यांशेजारी, फुटपाथवर, गल्लीबोळात स्वस्त आणि सहज मिळणारे गाड्यावरील चायनीज पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल असतो त्यातही या गाड्यांवर तरुणाईच जास्त दिसते. चायनीज गाड्यांवर तरुणाईची झुंबड उडाल्याचे चित्र दिसते. ग्रुपमधील कोणा मित्राचा वाढदिवस असेल तर तो साजरा करण्यासाठी तरुणाई चायनीज गाड्यावरच जातात. हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या तुलनेत येथे स्वस्तात पदार्थ मिळतात हे त्यामागचे मुख्य कारण आहे. मात्र हे पदार्थ स्वस्त देण्यासाठी तेथील आचाऱ्यांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्यात निकृष्ट प्रकारच्या भाज्या आणि तेल वापरले जाते. चायनीज पदार्थांमध्ये अजिनिमोटो हा पदार्थ वापरला जातो. पदार्थांना चव आणण्यासाठी या पदार्थाचा वापर केला जातो. आवश्यकतेपेक्षा जास्त अजिनोमोटो हा पदार्थ वापरला गेला तर त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होऊ शकतो.

चायनीज पदार्थांमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यासारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते. भात, बांबूचे मूळ, मशरूम, नूडल्स, चिकन यासारख्या पदार्थांचा चायनीज पदार्थांत समावेश होतो. बऱ्याचदा हे पदार्थ निकृष्ट दर्जाचेच असतात. चिकन, मांस अर्धवट शिजवले जातात. त्यामुळे ते पचायला जड जातात. चांगल्या प्रतीचा मैदा नसल्यास तो आतड्यात जाऊन चिकटू शकतो. चायनीज पदार्थांमध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश आणि रिफाईंड असल्याने पचनसंस्थेसाठी हितकारक नसतो. त्यामुळे चायनीज पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकरकच आहे.

एखाद्यावेळी चायनीज पदार्थ खाल्ल्याने ते ही चांगल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन तर बिघडत नाही. परंतु आठवड्यातून चार पाच वेळा चायनीज पदार्थ खाण्याची सवय हानिकारक ठरू शकते.