वाळू माफियांसाठी तहसीलदारांनी रात्र काढली सारंगखेडा नदीवर
राहुल आगळे
शहादा प्रतिनिधी
१२ मे, शहादा:
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील बॅरेजचे गेट लिकेज असल्याने पूर्वेकडील मोठा पाणीसाठा कमी होत आहे. टेंभा येथील तापी नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने, वाळूचा मोठा भूभाग मोकळा झाल्याने, या ठिकाणी वाळू तस्करांची मुजोरी सध्या सुरू असल्याने, यावर लगाम घालण्यासाठी महसूल प्रशासन ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. अवैध वाळू उपसा होऊ नये, म्हणून रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे. टेंभा येथील ग्रामपंचायत प्रशासन पोलीस व महसूल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे गेल्या दोन वर्षांपासून टेंभा येथे वाळूचा होणाऱ्या अवैध उपशावर लगाम घालण्यात महसूल प्रशासन ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासन यशस्वी ठरले.
मात्र गेल्या काही दिवसांपासून टेंभा येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे महसूल ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर, शनिवारी रात्री शहाद्याचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी एस. एन. डिगराळे, तलाठी सोमनाथ जाधव, चालक राजू गिरासे, कोतवाल संजय कोळी, कोतवाल भूपेंद्र गिरासे यांनी शनिवारी रात्री गस्त घातली. या गस्तीमुळे तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी वाळू तस्करांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष भरारी पथके तयार केली असून. ही पथके प्रकाशापासून ते तोरखेडापर्यंत गस्त घालणार आहेत. सध्या देऊर टेंभा खैरवे आदी ठिकाणांहून वाळू तस्करी होत असल्याची माहिती महसूल विभागाकडे प्राप्त झाल्याने ही भरारी पथके तयार केली असल्याचे तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, वाळू तस्करांवर महसूल प्रशासनाने आळा घातला असला, तरी काही माफियांची मोठ्या प्रमाणावर मुजोरी वाढली आहे.