विहीरीत विष टाकले, संप्तत ग्रामस्थांची रेवदंडा पोलिस ठाण्याकडे धाव

विहीरीत विष टाकले, संप्तत ग्रामस्थांची रेवदंडा पोलिस ठाण्याकडे धाव
अंधश्रध्दा व जादुटोणा ; मंतरलेल्या ताबीज बांधून विहीरीत विटा टाकल्या, तिघांवर गुन्हा दाखल

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- मुरूड तालुक्यातील ताडगाव गावाचे सार्वजनिक विहीरीवर काहीतरी टाकल्याचा संशयावरून एकास ग्रामस्थांनी हटकले, याबाबत पोलिसांना पाचारण करून सदर व्यक्‍तीस ताब्यात दिले. परंतू साळाव ते ताडगाव पर्यंत विहीरीत विष टाकले, अशा संशयकल्‍लोळाने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रेवदंडा पोलिस ठाणेकडे धाव घेतली. पोलिसांनी सुयोग्य तपास करून अंधश्रध्दा व जादूटोण्याच्या माध्यमातून मंतरलेले ताबीज बांधलेल्या विटा साळाव ते ताडगाव मधील सार्वजनिक विहीरीत टाकून सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराहट व दहशत निर्माण केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
मौजे ताडगाव गावाचे सार्वजनिक विहीरीवर रविवार दि. 11 मे 2025 रोजी सकाळी अकराचे सुमारास, एक व्यक्‍ती विहीरीत काहीतरी टाकत असल्याचे ग्रास्स्थ हरिश्‍चंद्र पाटील यांचे निदर्शनास येताच त्यांनी तेथेच माजी मुरूड पं.स. उपसभापती चद्रकांत मोहिते यांना माहिती दिली. त्या व्यक्‍तीस हरिश्‍चंद्र पाटील व चंद्रकांत मोहिते यांनी हटकले, व विचारणा केली, त्यावेळी सदर व्यक्‍तीने विहीरीत काहीतरी टाकल्याचे निदर्शनास आले.यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. सध्याच्या पाकिस्तान विरोधात सुरू असलेल्या युध्दजन्य परिस्थितीने ग्रामस्थांच्या मनात विहीरीत विष टाकल्याची शंका निर्माण झाली. त्यामुळे रेवदंडा पोलिसांना ही बाब कळविण्यात आली. रेवदंडा पोलिसांनी सदर व्यक्‍तीसह त्याच्या सोबत रिक्षामध्ये असलेल्या महिलेसह रेवदंडा पोलिस ठाण्यात आणले. यावेळी साळाव ते ताडगाव पर्यंत विहीरीत विष टाकले अश्या संशयकल्‍लोळ पंचक्रोशीत पसरल्याने परिसरातील ग्रामस्थांनी रेवदंडा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली, यावेळी रेवदंडा पोलिस ठाणे येथे मोठी गर्दी निर्माण झाली,या गर्दीत पंचक्रोशीतील ग्रामस्थ,युवावर्ग तसेच प्रतिष्ठीत मंडळीचा समावेश होता. यावेळी माजी पं.स.समिती उपसभापती चंद्रकांत मोहिते, कोर्लई सरपंच राजश्री मिसाळ, वळके ग्रा.प. माजी सरपंच किशोर काजारे, मोहन ठाकूर, सि.एम. ठाकूर, हरिश्‍चंद्र पाटील, आदीने पोलिसाना सार्वजनिक विहीरीचे पाणी तपासणी करण्याची विनंती केल्याने पोलिसानी आरोग्य अधिकारांस पाचारण करून सार्वजनिक विहीरीचे पाणी तपासणी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते यांनी सुध्दा रेवदंडा पोलिस ठाण्यात भेट घेवून ग्रामस्थांशी वार्तालाप केला. दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून रेवदंडा पोलिसांनी जादा पोलिस कुमक तसेच आरएसपी जवानाना पाचारण करून कडक बदोबस्त रेवदंडा पोलिस ठाणे येथे केला होता.
यावेळी रेवदंडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी केली असता, सदर व्यक्‍तीचे नाव अखलास खान वय 47 वर्षे, व महिलेचे नाव सेमा खान वय वर्षे 47 असून ते दोघेही पतीपत्नी असून नवी मुंबई नेरूळ येथील रहिवाशी आहेत. त्यांनी मुंलीने तिच्या प्रियकराचा नाद सोडावा म्हणून जादुटोणा करणारा मांत्रिक मौलाना खलिय राहणार गोंविदनगर कल्याण वेस्ट, यांचेशी आपसात संगणमत करून त्याचेकडून जादुटोणा करून मंतरलेल्या ताबीज बांधून घेतलेल्या पाच विटा त्यांनी नेरूळ येथून रेवदंडा येथे सोबत आणून साळाव ब्रिज ते ताडवाडी या मुरूड तालुक्यातील दरम्यानच्या गावातील रस्ता लगत असलेल्या सार्वजनिक विहीरीत सदरच्या जादुटोणा करून मंतरलेल्या, ताबीज बांधलेली प्रत्येकी एक विट, विहीरीच्या पाण्यात टाकून तसेच येथील जनतेच्या आरोग्यास अपाय व्हावा,या करीता विभूती सदृश्य आणखी काहीतरी दुष्ज्ञीत वस्तू पाण्यात टाकून विहीरीचे पाणी दुषीत करून सर्वसामान्य जनतेच्या मनात दहशत व घबराहट निर्माण होईल असे अघोरी कृत्य केले म्हणून रेवदंडा पोलिसांम चंद्रकांत मोहिते यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे नेरूळ नवी मुंबई येथील अखलास खान, सेमा खान तसेच कल्याण गोविंदनगर येथील मौलवी खलिय या तिघांवर रेवदंडा पोलिस ठाणे येथे भा.न्या.स. कलम 279, 3(5),महाराष्ट्र अंधश्रध्दा व जादुटोणा अधिनियम 2013 चे कलम 3(1)(2), प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कामी विशेष तपास अधिकारी म्हणून पेण पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे, तसेच मुरूड पोलिस ठाणे पो नि नामदेव बंडगर यांनी भेट दिली. तर रेवदंडा पोलिस ठाणे सपोनि. श्रीकांत किरविले हे तपास अधिकारी म्हणून काम पहात आहेत.