शटडाऊनमुळे युरिया उत्पादनावर परिणाम नाही; रायगड जिल्ह्यात पुरेसा खत पुरवठा
आरसीएफ चा खुलासा
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) च्या थळ प्रकल्पामध्ये वार्षिक नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी नियोजित शटडाऊन करण्यात आला होता. मात्र, या शटडाऊनचा युरिया खताच्या उत्पादनावर किंवा पुरवठ्यावर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाही.
आरसीएफ आणि जिल्हा कृषी विभाग यांच्या समन्वयामुळे रायगड जिल्ह्यातील युरियाचा पुरवठा अत्यंत सुरळीत असून, गेल्या वर्षीच्या मागणीपेक्षा अधिक खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. मागील वर्षी 11,500 मेट्रिक टन युरियाची मागणी असताना, RCF ने 12,019 मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून दिला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेळेत चालना मिळाली आणि उत्पादनात अडथळा आलेला नाही. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यात युरियाच्या टंचाईबाबत एकही तक्रार आली नव्हती आणि यंदाही तीच परंपरा कायम राहील, असा आत्मविश्वास आरसीएफ ने व्यक्त केला आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी देखील 11,932 मेट्रिक टन युरियाची मागणी करण्यात आली आहे, त्यापैकी 440.41 मेट्रिक टन युरिया आधीच वितरित करण्यात आला आहे. उर्वरित युरिया साठा पुढील ४.५ महिन्यांत नियोजितपणे पुरवण्यात येणार आहे.
सध्या स्थानिक वितरकांकडे 772.555 मेट्रिक टन युरिया साठा उपलब्ध असून, शेती हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी कोणतीही अडचण नाही. आरसीएफ कंपनीने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “भीती न बाळगता शेती कामे अधिक जोमाने सुरू ठेवावीत. यंदाचा मान्सून वेळेत येणार असून, शेतकऱ्यांनी तयारी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावी.”
आरसीएफ ही भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून, ६ मार्च १९७८ रोजी तिची स्थापना झाली. आरसीएफ ही देशातील सर्वात मोठ्या खत उत्पादक कंपन्यांपैकी एक असून, युरिया, कॉम्प्लेक्स खते, बायो-खते आणि औद्योगिक रसायनांचे उत्पादन करते.
आरसीएफ चा थळ प्रकल्प १९८५ पासून कार्यरत असून तो देशातील सर्वात मोठ्या खत उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. आरसीएफ कंपनीने देशात हरित क्रांती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिचे ब्रीदवाक्य “समृद्धीची एकत्र वाटचाल” हे केवळ घोषवाक्य नसून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सातत्याने चाललेली वचनबद्ध कृती आहे.
डॉ. राकेश कवळे
वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी