रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा
✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
8600942580
महाड : – शिवकालीन पांरपरिक वेशभूषेत रायगडावर आलेल्या शिवप्रेमींच्या उपस्थितीत आज किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आसमंतात दुमदुमला. तुतारींतून निघालेल्या ललकारी, ढोलताशांचा गजर आणि विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोषाने मंगलमय झालेल्या रायगडावरील वातावरणात शिवरायांच्या प्रतिमेवर जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. वरुणराजाने देखील हजेरी लावून आसमंतातून केलेला जलाभिषेकाच्या साक्षीने रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला.
शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकणकडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे आज 349 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. पावसाळी वातावरण असुनही हजारो शिवप्रेमींनी मोठया उत्साहात या सोहळयाला हजेरी लावली होती. या खासदार श्रारंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे, स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, कोकणकडा मित्र मंडळाचे सुरेश पवार उपस्थित होते.
रायगडाची गडदेवता शिरकाई मातेच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रायगडवाडीच्या सरपंच प्रेरणा सावंत उपयतांच्या हस्ते येथे पूजन करण्यात आले. राजसदरेवरील मेघडंबरी फुलांनी सजवण्यात आली होती. रात्री शाहिरी पोवाडे, जगदंबेचा जागर व गोंधळाने रायगडावर रंगत आली. पहाटे साडेवाजता ध्वजारोहण सोहळा व श्री शिवप्रतिमापूजन करण्यात आले. गडावरील विविध देवी-देवतांची विधीवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राजदरबार अशी शिवरायांच्या मुर्तीची पालखी सदरेवर वाजत गाजत आणण्यात आली. या मिरवणूकीत महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली.गडावर विविध धार्मिक विधी, पूजापाठ, वेद-मंत्रघोषाने रायगडाच्या कडेकपारी रोमांचीत झाल्या होत्या. पावसाचा गारवा व दाट धुक्यातही शिवप्रेमींमधील अलोट उत्साह दिसत होता. मध्येच येणारी पावसाची सरही कार्यक्रमाची शोभा वाढवत होती. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात वेदउच्चारासोबत सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सिंहासनाधिष्टीत करण्यात आली. खा.श्रारंग बारणे व खा.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेवर सुवर्ण नाण्यांचा व दुग्धाभिषेक करण्यात आला.छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूंच्या पाण्याने जलाभिषेकही करण्यात आला. हा क्षण सदर, होळीचा माळ, बाजारपेठ येथे उपस्थित असलल्या हजारो शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला नेऊन ठेवणारा होता. राज्याभिषेकानंतर हलगी, ढोलताशे, लेझीम, मुदमंगाच्या वाद्यात, शिवजयघोषात शिवप्रेमींच्या उत्साहात शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक राजसदरेहून होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर अशी नेण्यात आली. होळीच्या माळावर दांडपट्टे, लाठीकाठी, तलवारबाजी असा मर्दानी खेळा बरोबरच लेझीम सादरीकरणही दिमाखात करण्यात आले.