गुरुपौर्णिमा महोत्सव २०२५ भक्तिभावात पडला पार
सद्गुरु मोरे माऊली महाराज सेवा समिती (कोकण विभाग) यांचे यशस्वी आयोजन
सिद्धेश पवार
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर : कोकण विभागाच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव २०२५ हा सोहळा सद्गुरु मोरे माऊली महाराज सेवा समिती (कोकण विभाग) यांच्यावतीने मोठ्या भक्तिभावाने आणि अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला. कोकणच्या परमार्थिक संस्कृतीचा गौरव वाढवणारा हा महोत्सव परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या पावन उपस्थितीत आणि श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या आशीर्वादाने संपन्न झाला.
या पवित्र सोहळ्याला विविध राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यास विशेष महत्त्व प्राप्त करून दिले. विशेषतः नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या व्यस्त अधिवेशनातून वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावली आणि सद्गुरुंच्या हस्ते सन्मानित झाले. त्यांनी सद्गुरुंचे चरणवंदन करून त्यांचा कृपा आशीर्वाद घेतला.
कार्यक्रमाची प्रमुख रूपरेषा पुढील प्रमाणे होती –
सकाळी ८:३० वाजता ह.भ.प. प्रकाश भाऊराव मोरे (गोळेगणी) यांच्या शुभहस्ते श्री सद्गुरु ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गुरुपरंपरा सामूहिक भजन, व्यासपीठ पूजन आणि पाठपूजन झाले. पाठपूजन श्री व सौ. श्रीराम विठोबा गायकवाड (धामणदेवी) यांच्या हस्ते पार पडले.
यानंतर परमपूज्य सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांचे मार्गदर्शनपर प्रवचन झाले, ज्यातून हजारो साधकांनी आध्यात्मिक प्रेरणा घेतली. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भक्तांनी सद्गुरुंच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.
कोकण विभागातील सर्व शिष्यगण, भक्तवर्ग आणि सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात लाभला. भावपूर्ण वातावरणात, अनुशासनबद्ध आणि भक्तिरसात न्हालेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. लक्ष्मण मोरे यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत पार्टे, कार्याध्यक्ष चंद्रकांत कळंबे, सेक्रेटरी लक्ष्मण मोरे आणि संपूर्ण कोकण विभागीय मोरे माऊली सांप्रदाय – पोलादपूर, रायगड यांनी मोलाचे योगदान दिले.
या सोहळ्याच्या निमित्ताने कोकणभूमी एकसंध भक्तिभावाने भरली होती, आणि श्रद्धेचा एक सुंदर सोहळा अविस्मरणीय ठरला.