जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी अनुभवला भात लागवडीचा अनुभव
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- चिखलात उतरून भाताची रोपे लागवड करण्याचा अनुभव जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी अनुभवला. शेतकऱ्याना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी एक दिवस शेतकऱ्यांसाठी या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन भात पिक लागवडीचा कार्यक्रम करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार म्हणून ओळख आहे. सध्या भातपिकाची लावणीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी कृषी विभागामार्फत सर्व खाते प्रमुख यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन एक दिवस शेतकऱ्यांसाठी या संकल्पनेतून भात पिक लागवडीचा कार्यक्रम करुन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम राबविण्याचं ठरविले होते. या उपक्रमांतर्गत अलिबाग तालुक्यातील भाल येथील शेतकरी कृष्णा दळवी यांच्या शेतावर भात लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर वेळी गावातील शेतकऱ्यांनी यापूर्वी बरेच अधिकारी शेतावर भेट देण्यासाठी आले. परंतु प्रत्यक्षात शेतात काम करण्यासाठी व आम्हास प्रोत्साहीत करण्यासाठी आपणच पहिल्यांदा आलात अशा भावना व्यक्त करीत सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
सदर भात लागवड कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचीक, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाठारे, कृषी विकास अधिकारी महेश नारायणकर, जिल्हा कृषी अधिकारी निकिता सुर्यवंशी, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्यासह अलिबाग व मुरुड पंचायत समितीमधील अधिकारी सहभागी झाले होते.
…………………
शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोबतच यांत्रिकीकरणाचा जास्तीत जास्त वापर करावा व सेंद्रिय शेतीकडे जास्त लक्ष केंद्रित करावे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या कृषी उत्पन्नामध्ये वाढ करण्याकरीता रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील विविध कृषी योजनांचा लाभ घ्यावा.
: नेहा भोसले
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड.
………………….