नाल्यात कार उलटून कोल्हापूरच्या दोन तरुणांचा सातारा येथे मृत्यू.

✒लियाकत मदारी✒
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी
99603 65075
कोल्हापुर/सातारा, दि.12 ऑगस्ट:- सातारा जिल्हा न्यायालयासमोर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूरमधील दोन तरुण घटनास्थळी मयत झाले असून, एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे.
अनिकेत राजेंद्र कुलकर्णी वय 23 वर्ष, रा. मंगळवार पेठ, आदित्य प्रताप घाटगे वय 23 वर्ष, रा. कसबा बावडा, दोघे कोल्हापूर अशी मृत युवकांची नावे आहेत. तर, देवराज अनाप्पा माळी वय 21 वर्ष, रा. कसबा बावडा हा गंभीररित्या जखमी झाला आहे.
कोल्हापुर येथील अनिकेत, आदित्य आणि देवराज हे तिघे साता-यात फिरण्यासाठी गेले होते. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांची कार जिल्हा न्यायालयासमोर आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व ती थेट पूलावरून खाली गेली. कारचा चेंदामेंदा झाल्याने बचावासाठी तिघे मित्र ओरडू लागले. परिसरातील रिक्षा चालकांसह इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेऊन बचावकार्य राबवले. अंधार, पाणी, खोल यामुळे बचाव कार्याला अडथळे येऊ लागले. दुर्दैवाने त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. दोघा गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सकाळी त्यातील एकाचा मृत्यू झाला.