गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळाचे गणपती

सुविधां देण्यासाठी यंत्रणा सतर्क

 

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 तर 286 खासगी सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार असून पोलीस व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. गणेशोत्सव 2025 शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, महसूल, पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय विभागांनी गणेशोत्सव आनंदात व सुव्यवस्थित होण्यासाठी उपाययोजना व नियोजन पूर्ण केले आहे. जिल्ह्यात गणेश उत्सवाचे पूर्वतयारी जोरात सुरू असताना प्रशासन देखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राखणे, गणेश भक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करणे, कोकणामध्ये खास गणवेशोत्सवासाठी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करणे या दृष्टीने सतर्क झाले आहे.

गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट, सुविधा केंन्द्र, क्रेन, अॅम्ब्युलन्स व होमगार्ड नेमण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंन्द्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल. वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकिय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओ.आर.एस. आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांक निहाय आदेश देण्यात आले आहेत. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश लागू राहतील. यानुसार 23 ऑगस्ट 2025 सायंकाळी 18.00 वाजेपासून ते 29 ऑगस्ट 2025 रात्री बारा वाजेपर्यंत तसेच 2 सप्टेंबर 2025 सकाळी 8 वाजेपासून ते 04 सप्टेंबर 2025 रात्री 8 वाजेपर्यंत तसेच 06 सप्टेंबर 2025 सकाळी 8 वाजेपासून ते 08 सप्टेंबर 2025 रात्री 8.00 वाजेपर्यंत आदेश अंमलात राहणार आहेत.

या गणेशोत्सवाची सांगता दीड दिवस, पाच दिवस,सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसाचे 06 सप्टेंबर 2025 रोजी आणि 21 दिवसाचे गणपती 27 सप्टेंबर 2025 रोजी यानुसार विसर्जनाचे दिवशी होईल. यासाठी सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. यातील समुद्रावर 52 गणेशमुर्ती विसर्जन, खाडीमध्ये 105 गणेशमुर्ती विसर्जन, नदीमध्ये 244 गणेशमुर्ती विसर्जन, तलावामध्ये 100 गणेशमुर्ती विसर्जन व इतर ठिकाणी 94 गणेशमुर्ती विसर्जन होणार आहे . या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाकडून सुविधा नियोजन व उपाययोजना करण्यात येत आहे.

मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद हा सण दि.5 सप्टेंबर 2025 रोजी साजरा होत आहे. जिल्हयात नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असून विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्याकरीता पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

गणपती उत्सवादरम्यान जिल्हयात पोलिस,होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी कर्मचारी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या कालावधीत दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी एटीबी व एटीसी चे पथक नेमण्यात आले असून सोशल मिडीया देखरेख करण्याकरीता सायबर सेल सतर्क आहे. प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शांतता कमिटी बैठका मोहल्ला कमिटी बैठका घेतल्या आहेत. मंडळ बैठका, गावभेटी, दंगाकाबू पथकाने रंगीत तालीम, रुट मार्च करण्यात येत आहेत .

या बैठकीला विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच रायगड जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.