Home latest News मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात चंद्रपूर जिल्हा अव्वल असावा – पालकमंत्री डॉ. उईके
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात चंद्रपूर जिल्हा अव्वल असावा – पालकमंत्री डॉ. उईके
ग्रामस्तरावर सुक्ष्म नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या सुचना
आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराचे वितरण
✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230
चंद्रपूर, दि. 12 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. 100 दिवसांचे आणि 100 गुणांचे हे उत्कृष्ट अभियान असून यात प्रत्येक ग्रामपंचायत सक्षम होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपला जिल्हा राज्यात अव्वल राहील, यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे, अशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके (पंचायत), नुतन सावंत (सामान्य), शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे, अश्विनी केळकर (प्राथ्.) मान्याची वाडी गावचे (ता.पाटण, जि. सातारा) सरपंच रविंद्र माने आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, या अभियानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती अधिक सक्षम, पारदर्शक, जलसमृध्द, उपजिविका विकास, सामाजिक न्याय आदी बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. लोकसहभागातून ज्या ग्रामपंचायती उत्कृष्ट कार्य करतील त्यांना जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ सेवा पंधरवड्यापासून म्हणजे 17 सप्टेंबर पासून सुरू होईल. संपूर्ण राज्यात 100 दिवस म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम राहील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायतींनी ध्येय ठेवून काम करावे : सरपंच रविंद्र माने
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान हे गावाचा चेहरा मोहरा बदलविणारे अभियान आहे. केवळ उत्पनावर ग्रामपंचायत चालत नसते तर वेगवेगळ्या अभियानात सहभागी होऊन पुरस्काराच्या माध्यमातून आपण आपली ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो. पुरस्काराच्या रकमेतून गावाचा व गावातील प्रत्येक कुटुंबाचा विकास करणे शक्य आहे. मात्र त्यासाठी ग्रामपचांयतींनी ध्येय ठेवून काम करावे, असा सल्ला केंद्र आणि राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मान्याची वाडी (ता. पाटण, जि. सातारा) चे सरपंच रविंद्र माने यांनी उपस्थित सरपंचांना दिला. एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अतिशय उत्कृष्ट अभियान आहे. आतापर्यंत राबविलेल्या सर्व अभियानाचा यात सारांश आहे. प्रत्येक अभियान हे वर्षभरासाठी असते मात्र हे अभियान केवळ 100 दिवसांचे व 100 गुणांचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने 8 मुद्यांवरील 50 प्रश्नांवर काम करायचे आहे. पुढील 100 दिवस प्रत्येक सरपंचांनी गावातच राहून हे अभियान यशस्वी करावे तसेच जिल्ह्यासाठी पुरस्कार प्राप्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.
आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वाटप : सन 2024-25 चे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार रंजना मुळे, (ग्रा. पं. वढा, चंद्रपूर), विजय पचारे (ग्रा.पं. मुधोली / पळसगाव सी./वडाळा तु. भद्रावती), सचिन घारगे, (ग्रा.प.मेसा/ वनोजा, वरोरा), आनंद गलबले, (ग्रा.पं. चेकजाटेबार, चिमुर), ऋषीश्वर औरासे, (ग्रा.पं. वांद्रा/ आक्सापुर, ब्रम्हपूरी) यांच्यासह 15 जणांना देण्यात आला.
सन 2023-24 च्या पुरस्कारप्राप्त अधिका-यांमध्ये अनिता दुधे (ग्रा.पं. धानोरा, चंद्रपूर), जयश्री चंदनखेडे (ग्रा.पं. चालबर्डी/ चपराळा, भद्रावती), विद्या गिलबीले, (ग्रा.पं. आंनदवन, वरोरा), भगवंत नरड,(ग्रा.पं. बोथली (वहा) चिमुर), मंगेश गोवर्धन, (ग्रा.पं बेलगांव जाणी/ तोरगांव खु., ब्रम्हपूरी) यांच्यासह 15 अधिकारी तर सन 2022-23 चे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्रकाश पवार ,(ग्रा.पं. पिंपळखुट, चंद्रपूर), राजेन्द्र अवघड, (ग्रा.पं. घोनाड, भद्रावती), विद्या गिलबीले, (ग्रा.पं. आनंदवन, वरोरा), विठ्ठल नखाते, (ग्रा.पं. कळमगांव, चिमुर), होमदेव तलांडे , (ग्रा.पं. बरडकिन्ही, ब्रम्हपूरी) यांना देण्यात आला.