व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट करणे जीवावर बेतले; घरात घुसून युवकाचा खून
प्रतिनिधी
नागपूर : व्हॉट्सॲप ग्रुपवरील पोस्टवर चिडवणारी कमेंट केल्यामुळे चिडलेल्या तीन बापलेकांनी शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकू आणि तलवारीने भोसकून खून केला. ही थरारक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबाझरीत उघडकीस आली. या हत्याकांडात अंबाझरी पोलिसांनी तिघांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक संतराम नहारकर (३८, रा. पांढराबोडी, ट्रस्ट ले-आउट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मुन्ना महतो (५०), रामू उर्फ चुन्नी महतो (२६) आणि चेतन महतो (२४) अशी अटकेतील आरोपींचा नावे आहेत. चुन्नी आणि चेतन दोघेही भाऊ एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहेत. दोन महिण्यांपूर्वी अशोक नहारकर हासुद्धा त्या व्हॉट्सॲप ग्रुपशी जुळला. या ग्रुपवर सामाजिक कार्याबाबत मॅसेज येतात.
चुन्नीने केलेल्या समाज कार्याचे फोटो आणि मॅसेज त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकले. त्यावर अशोकने चिडवण्यासाठी कमेंट केले. त्यामुळे चुन्नी आणि चेतन चिडले. त्यांनी ग्रुपवरच अशोकला शिवीगाळ केली. त्यानंतर अशोक यानेही दोघेही भावांना शिवीगाळ केली. तेव्हा दोघांनीही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली होती.
दोन दिवसांपूर्वी घरासमोर अशोक उभा होता. त्यावेळी चेतनने अशोकला शिवीगाळ केली. रविवारी रात्री दहा वाजता अंगनात उभा असताना चुन्नी तेथे आला. दोघांनी एकमेकांकडे रागाने पाहिले. रागाने पाहिल्यामुळे चिडलेल्या चुन्नीने लहान भाऊ चेतनला आवाज दिला. चेतन आणि वडील मुन्ना हे दोघेही पळतच अशोक याच्या घरी आले.
तिघांसोबत अशोकची बाचाबाची झाली. वाद वाढत गेल्यानंतर चेतन आणि मुन्नाने घरात घुसून अशोकचे दोन्ही हात पकडले तर चुन्नी याने तलवारीने अशोक याच्या पोटात तलवार भोसकली. नंतर तिघांनीही चाकू, तलवारीने अशोक याच्यावर सपासर वार करीत ठार मारले. याप्रकरणी दिनेश नहारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अंबाझरी पोलिसांनी तासाभरात तिन्ही आरोपींना अटक केली.
तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील
आरोपी चेतन महतो आणि चुन्नी महतो हे दोघेही भाऊ गुन्हेगारी आलेखावरील आहे. चेतन हा २०१५ पासून गुन्हेगारीत सक्रिय असून त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे आहेत. तसेच चुन्नी महतो हासुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावरही अंबाझरी पोलिस ठाण्यात २०१९ ला गुन्हे दाखल आहेत.